Jasprit Bumrah मुळे BCCI टेन्शनमध्ये, ‘या’ देशाचे डॉक्टर करणार सर्जरी
Jasprit Bumrah injury : सर्जरीनंतर जसप्रीत बुमराह अजून किती महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार? वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाला आपल्या प्रमुख गोलंदाजाची आवश्यकता आहे.

Jasprit Bumrah injury : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपपर्यंत फिट होणार का? हा भारतीय क्रिकेट टीम, बीसीसीआय आणि चाहत्यांसमोरचा मुख्य प्रश्न आहे. भारतात या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला आपल्या प्रमुख गोलंदाजाची आवश्यकता आहे. पण सध्या समोर येत असलेल्या बातम्यांवरुन टीम इंडिया, बीसीसीआय आणि चाहत्यांच्या टेन्शन वाढत आहे. बुमराहच्या फिटनेसवरुन बीसीसीआयला सातत्याने प्रश्न विचारले जातायत. त्यामुळे बीसीसीआय कुठलाही चान्स घेणार नाही. सर्जरीसाठी त्याला परदेशात पाठवण्यात येणार आहे.
क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार, पाठदुखीने त्रस्त असलेल्या बुमराहच्या शस्त्रक्रियेबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. आपला स्टार गोलंदाज दुखापतीमधून पूर्णपणे बरा व्हावा, यासाठी बीसीसीआय बुमराहला न्यूझीलंडला पाठवण्य़ाची तयारी करत आहे. तिथे ऑकलंड येथे प्रसिद्ध सर्जन बुमराहच ऑपरेशन करतील. बीसीसीआय आणि NCA ने बुमराहच्या सर्जरीसाठी या डॉक्टरची निवड केलीय.
बुमराहला बरं होण्यासाठी किती महिने लागतील?
बुमराहला मागच्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात सर्वप्रथम पाठदुखीचा त्रास झाला होता. त्याच्या पाठिला स्ट्रेस फ्रॅक्चर आहे. त्यानंतर तो टीमच्या बाहेर आहे. आशिया कपच्यावेळी तो बाहेर होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीजसाठी त्याची टीममध्ये निवड केली.. पण हा निर्णय चुकला. त्याची दुखापत आणखी बळावली. त्यानंतर फिटनेस कमावून मैदानावर परतण्याचे सर्व प्रयत्न तोकडे पडले. त्यामुळेच तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही.
बुमराह बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याला बरं होण्यासाठी अजून काही महिने लागतील. सर्जरीनंतर पूर्णपणे बरं होण्यासाठी बुमराहला कमीत कमी 20-24 आठवडे म्हणजे 5-6 महिने लागतील. वर्ल्ड कपपर्यंत पुनरागमन लक्ष्य
आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बुमराह खेळणार नाही, हे स्पष्ट आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतही तो कदाचित खेळणार नाही. बुमराहला फिट करणं, हीच सध्याच्या घडीला बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटची प्राथमिकता आहे. वर्ल्ड कपपर्यंत फिट होणं, हे मुख्य लक्ष्य आहे.
