बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला आराम देणार? क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली
भारत विरुद्ध बांग्लादेश दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. हा कसोटी सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर होणार आहे. त्यामुळे तीन वेगवान गोलंदाजांऐवजी दोनवरच भागून जाईल.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कानपूरला पोहोचले असून कसून सराव सुरु झाला आहे. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघ त्याच प्लेइंग 11 सह उतरण्याची शक्यता असते. पण कानपूरची खेळपट्टी ही काळ्या मातीची असून चेपॉकपेक्षा वेगळी आहे. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर चेंडू कमी उसळी घेतो. त्यामुळे या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण जातं. त्यामुळे तीन वेगवान गोलंदाजांपेक्षा तीन फिरकीपटू घेऊन खेळण्याची शक्यता आहे. चेन्नईत भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि आकाश दीप हे प्लेइंग 11 मध्ये होते. आता या तिघांपैकी एकाला आराम देऊन कुलदीप यादव किंवा अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आराम देण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भारतीय वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यातील महत्त्वाची गोलंदाज असून त्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. त्याला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही आराम दिला गेला होता. तसेच झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यातही त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह थेट बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत खेळला. पण कसोटीत भारताचं व्यस्त शेड्युल पाहता काळजी घेणं गरजेचं आहे. खासकरून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यामुळे बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. कारण या दोन कसोटीत फक्त तीन दिवसांचं अंतर आहे.
भारताला बांग्लादेश विरुद्धचा दुसरा कसोटी सामनाही तितकाच महत्त्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. भारताला गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवायचं असेल. तर काहीही करून दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल. नाहीतर विजयी टक्केवारीत कमालीची घट होईल.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली , केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा , रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
