
इंग्लंडने T20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात यूएस संघाचा 10 गडी राखून पराभव केलाय. त्यामुळे इंग्लंड संघ आता उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलाय. इंग्लंडने पाचव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. जोस बटलर आणि ख्रिस जॉर्डन यांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिलाय. जोस बटलरने झंझावाती अर्धशतक झळकावले. ख्रिसने एकाच ओव्हरमध्ये चार विकेट घेत अमेरिकेच्या फलंदाजीचा कणा मोडला.
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात जोस बटलर याने 38 बॉलमध्ये 6 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 83 धावा केल्या. T20 विश्वचषक स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक सिक्स मारणारा कर्णधार बनला आहे. त्याने ख्रिस गेलची बरोबरी केली असून महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. बटलरने टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून 17 सिक्स मारले आहेत. ख्रिस गेलनेही कर्णधार म्हणून 17 सिक्स मारले आहेत. महेंद्रसिंग धोनीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून 16 सिक्स मारले आहेत.
जोस बटलर- 17 षटकार
ख्रिस गेल- 17 षटकार
महेंद्रसिंग धोनी- 16 षटकार
केन विल्यमसन- 12 षटकार
जोस बटलर याने अनेकदा स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिलाय. त्याने इंग्लंड संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने २०२२ च्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानी संघाचा पराभव केला होता. यंदाही इंग्लंडने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने १० व्या ओव्हरमध्येच सामना जिंकला. इंग्लंडकडून बटलरने 83 आणि फिल सॉल्टने 25 धावांचे योगदान दिले. ख्रिस जॉर्डनने घातक गोलंदाजी केली. 2.5 षटकात त्याने 10 धावा देत 4 विकेट घेतले. सॅम कुरन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन विकेट घेतले.