
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पुढच्या सामन्यासाठी कर्नाटकने संघाची घोषणा केली आहे. मागच्या सामन्यात मध्य प्रदेशने कर्नाटकला 217 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे कर्नाटकने पुढच्या सामन्यासाठी खास रणनिती आखली आहे. या संघात काही आश्चर्यकारक बदल केले आहेत. या सामन्यापूर्वी कर्नाटकने कर्णधार बदलला आहे. मयंक अग्रवालच्या जागी कर्णधारपदाची धुरा देवदत्त पडिक्कलच्या खांद्यावर सोपवली आहे. देवदत्त पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे या सामन्यात त्याच्यावर विश्वास टाकला आहे. इतकंच काय तर केएल राहुल या सामन्यासाठी संघात निवड झाली आहे. केएल राहुलसोबत या संघात प्रसिद्ध कृष्णा याचीही निवड झाली आहे. दरम्यान या संघात करूण नायर असणार नाही. कारण फिट नाही. तसेच अभिनव मनोहरलाही ड्रॉप केलं आहे. हा सामना 29 जानेवारीला पंजाब विरुद्ध मोहालीत होणार आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचा संघ गट ब मध्ये आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना गमावला आहे. तीन सामने ड्रॉ झाले आहेत. कर्नाटकचे 21 गुण असून +0.544 नेट रनरेट आहे. या पर्वात कर्नाटककडून करूण नायरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 614 धावा केल्या आहेत. यात 2 शतकं आणि 2 अर्धशतकं ठोकली आहेत. त्यानंतर रविचंद्रन स्मरणने 5 सामन्यात 119 च्या सरासरीने 595 धावा ठोकल्या आहेत. त्यानेही दोन शतकं आणि दोन अर्धशतकं ठोकले आहेत. फिरकीपटू श्रेयस गोपाळने सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 31 विकेट घेतल्या आहेत.
Wholesale changes in #Karnataka #RanjiTrophy team. Padikkal replaces Mayank as captain. KL Rahul comes back along with Prasidh. Abhinav dropped , Karun ruled out pic.twitter.com/W8IAMuXotS
— Manuja (@manujaveerappa) January 26, 2026
कर्नाटकचा रणजी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, केवी अनीष, देवदत्त पडिक्कल (कर्णधार), रविचंद्रन स्मरण, श्रेयस गोपाळ, कृतिक कृष्णा, एम वेंकटेश, विद्वत कवेरप्पा, प्रसिद्ध कृष्णा, मोहसिन खान, शिखर शेट्टी, केएल श्रीजित आणि ध्रुव प्रभाकर.