संजू सॅमसन फेल तरी प्लेइंग 11 मध्ये मिळणार स्थान, माजी कर्णधार पाठिंबा देत म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या तिन्ही सामन्यात फेल गेला. तिसऱ्या सामन्यात तर खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं कठीण झालं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका एकतर्फी जिंकली. सुरुवातीच्या तीन सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घातली. त्यामुळे भारताची टी20 वर्ल्डकपसाठी चांगली तयारी झाल्याचं दिसून येत आहे. असं असताना विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात संजू सॅमसन काही खास करू शकला नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं कठीण होईल, अशी चर्चा रंगली आहे. तिलक वर्माची संघात एन्ट्री होताच विकेटकीपर फलंदाज म्हणून इशान किशनचा विचार केला जाईल असं बोललं जात आहे. पण या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने संजू सॅमसनची साथ दिली आहे. रहाणेच्या मते, इशान किशन बाहेर जाईल आणि संजू सॅमसनला संधी मिळेल.
अजिंक्य रहाणेने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, संजू सॅमसन एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला खराब कामगिरीनंतरही टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं पाहीजे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘मॅनेजमेंट आणि कर्णधार यांचा त्याच्यावर विश्वास असेल. ते त्याच्यासोबत असतील. संजू सॅमसन एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यात कौशल्य आहे. या फॉर्मेटमध्ये असं आहे की लवकर आऊट झालं की तुम्ही चुकीचं ठरता. आऊट होण्याची पद्धत अनेकांना आवडणार नाही. पण यात काहीच नाही. या फॉर्मेटमध्ये तुम्हाला निर्धास्त खेळावं लागतं. स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल.’
अजिंक्य रहाणेने संजू सॅमसनला सल्ला देताना सांगितलं की, ‘त्याला खेळपट्टीवर काही काळ घालवावा लागेल. सुरुवातीच्या दोन षटकात त्याने निवांत खेळावं. त्यानंतर त्याने त्याचा खेळ खेळावा. मला वाटतं की इशान किशनला बाहेर बसावं लागेल. संजू सॅमसन प्लेइंग 11 मध्ये राहील. भले संजू सॅमसनने पुढच्या दोन सामन्यात धावा केल्या तरी आणि नाही तरी..’ भारत पुढचा टी20 सामना 28 जानेवारीला खेळणार आहे. या सामन्यात संजू सॅमसनला धावा करणं गरजेच आहे.
