गौतम गंभीरला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला, नेमकं काय घडलं?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाने जय्यत तयारी केली आहे. गतविजेता भारतीय संघ प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. पण या स्पर्धेपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीरला एक सल्ला देण्यात आला आहे. असं का ते जाणून घ्या

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासही मागे पुढे पाहात नाही. गौतम गंभीरचा हा स्वभाव अनेकांनी मैदानातही पाहिला आहे. एक घाव दोन तुकडे असा स्वभाव असल्याने अनेकदा नुकसानही झालं आहे. नुकताच शशि थरूर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करून एक लांबलचक संदेश लिहिला होता. पण आता गौतम गंभीरला सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गौतम गंभीरला हा सल्ला दुसरा तिसरा कोणी दिला नसून माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे याने दिला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपेपर्यंत भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे.
अजिंक्य रहाणे याने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, ‘माझा एक सल्ला आहे की गौतम गंभीरने सोशल मीडियापासून दूर राहावं. लोकं त्यांच्याबाबत काय बोलत आहेत? याबाबत त्यांनी जास्त विचार करू नये. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत चांगलं क्रिकेट खेळलं आहे. आता ते मुख्य प्रशिक्षक आहेत आणि मोठी जबाबदारी आहे. माझा वैयक्तिक सल्ला आहे की त्यांनी या गोष्टींपासून दूर राहावं. मी हेच करत होतो. सोशल मीडियापासून दोन हात लांब ठेवत टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करावं.’
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकाकारांच्या रडारवर आहे. एखादी वनडे किंवा कसोटी मालिका गमावली की टीकेचा धनी ठरतो. नुकतंच न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावली होती. त्यानंतर गौतम गंभीरवर खालच्या पातळीवर टीका झाली. त्यानंतर गौतम गंभीर सोशल मीडियावर व्यक्त झाला होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वात टीम इंडिया टी20 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका जिंकली. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. जर भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला तर दोन आयसीसी चषक जिंकणारा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरेल.
