T20 World Cup स्पर्धेत खेळण्याबाबत पाकिस्तानची नाटकं सुरू, या दिवशी ठरणार खेळायचं की नाही?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाला संधी मिळाली आहे. आता पाकिस्तानने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची रणनिती आखळी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वीने बहिष्काराचे संकेत दिले आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र बांगलादेशने आडमुठी भूमिका घेतल्याने आयसीसीला ऐनवेळी स्कॉटलँडला तिकीट द्यावं लागलं आहे. बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाटकं सुरू झाली आहेत. अजूनही स्पर्धेत खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मते, स्पर्धेत सहभागी व्हायचं की नाही याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी 26 जानेवारीला पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. या बैठकीत याच मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीतून बाहेर आल्यानंतर मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केलं की, स्पर्धेत खेळायचं की नाही या बाबतचा निर्णय शुक्रवारी 30 जानेवारी किंवा सोमवारी 2 फेब्रुवारीला घेतला जाईल.
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात वर्ल्डकप स्पर्धेबाबत जवळपास एक तास चर्चा झाली. या मुलाखतीनंतर मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केलं की, पंतप्रधानांनी सर्व पर्याय खुले ठेवण्यास सांगितले आहेत. तसेच या बाबतचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मोहसिन नक्वी यांनी सांगितलं की, ‘पंतप्रधानांना आयसीसी प्रकरणी माहिती दिली आणि त्यांनी आदेश दिले की सर्व पर्याय खुले ठेवा. तसेच हे प्रकरण सोडवा. या प्रकरणी एकमत झालं की अंतिम निर्णय 30 जानेवारी किंवा सोमवारी 2 फेब्रुवारीला घेतला जाईल.’
पीसीबी अध्यक्षांच्या बैठकीनंतर पाकिस्तानी मीडियात एक मोठा दावा करण्यात येत आहे. पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेईल. पण 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकते. म्हणजेच पाकिस्तान हा सामना सोडून इतर सर्व सामने खेळू शकते. म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुढच्या काही दिवस नाटकी करणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आयसीसीला प्लान बी रेडी ठेवणं गरजेचं झालं आहे. पाकिस्तानने ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली तर युगांडा या संघाला आधीच कल्पना देणं आवश्यक आहे. कारण पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वीने 24 जानेवारीला स्पष्ट केलं होतं की, पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार की नाही याचा निर्णय देशाचं सरकार घेईल. सरकार जो आदेश देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल हे स्पष्ट केलं.
