लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेची तारीख ठरली, कधीपासून सामने? जाणून घ्या
ऑलिम्पिक स्पर्धेचं सुवर्ण पदक मिळवण्याचं सर्वच देशांचं स्वप्न असतं. यासाठी चार वर्षांची वाट पाहावी लागते. आता ऑलिम्पिक स्पर्धा 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. यातील क्रिकेट स्पर्धांचा तारीख निश्चित करण्यात आली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण 128 वर्षांपूर्वी झालेल्या ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात शेवटची क्रिकेट स्पर्धा पार पडली होती. या सामन्यात ग्रेट ब्रिटनने फ्रान्सचा 185 धावांनी पराभव केला आणि सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा क्रिकेटचा स्पर्धेत सहभाग झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुलली आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश आहे. टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही स्पर्धा 12 जुलै 2028 पासून 29 जुलै 2028 पर्यंत असणार आहे. 18 दिवस ही स्पर्धा असणार आहे. कॅलिफोर्नियातील पोमोना येथील फेअरग्राउंड्स क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . क्रिकेट सामन्यांचा पहिला टप्पा 12 ते 18 जुलै दरम्यान होईल , त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामने 22 ते 28 जुलै दरम्यान होतील. अंतिम सामना 29 जुलै रोजी फेअरग्राउंड्स क्रिकेट स्टेडियमवर होईल.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संघांची निवड आयसीसी टी20 संघांच्या क्रमवारीच्या आधारे होणार आहे. क्रमावारीनुसार पहिल्या सहा संघांचा विचार केला आहे. लॉस एंजेलिस ऑलिंपिकचे आयोजन करणाऱ्या यूएसए संघाला क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे या संघातून सहा संघ हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेत 6 पुरुष आणि 6 महिला क्रिकेट संघ असतील. प्रत्येक संघात 15 सदस्य असतील.
Big news!🚨
We’re celebrating being exactly three years out from the 2028 Olympic Games by sharing the OFFICIAL OLYMPIC COMPETITION SCHEDULE! From where the first medal will be awarded to action-packed days that already have us cheering, this schedule is the first step in… pic.twitter.com/8rgSjFwlgQ
— LA28 (@LA28) July 14, 2025
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने 2028 च्या खेळांमध्ये समाविष्ट होणाऱ्या पाच नवीन खेळांमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस (सिक्सेस) आणि स्क्वॅशसह क्रिकेटला मान्यता दिली आहे. यापूर्वी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे झालेल्या 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. या खेळांमध्ये ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले, तर भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आता क्रिकेट ऑलिंपिकमध्ये प्रवेश करत असल्याने, भारताला सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा आहे.
