आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड काय बोलून गेला? सोशल मीडियावर खळबळ

आयपीएल स्पर्धेत 17 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयाची गुढी उभारली आहे. 2008 साली पहिल्यांदा चेपॉकवर विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर सतत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला 50 धावांनी पराभूत केलं. मात्र ऋतुराज गायकवाड निशाण्यावर आला आहे.

आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड काय बोलून गेला? सोशल मीडियावर खळबळ
ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 29, 2025 | 6:07 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत रजत पाटिदारच्या नेतृत्वात आरसीबीची विजयी घोडदौड सुरु आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता आणि दुसऱ्या सामन्यात चेन्नईला पराभूत करत अव्वल स्थान गाठलं आहे. चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत गेल्या 17 वर्षांचं दृष्टचक्र मोडून काढलं आहे. कारण 17 वर्षानंतर आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. चेन्नई सुपर किंग्स 20 षटकात 8 गडी गमवून 146 धावा केल्या. तसेच 50 धावांनी पराभव झाला. पण या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड आपल्या फॅन्सच्या निशाण्यावर आला आहे. नेमकं काय बोलला ते जाणून घ्याचेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सामना संपल्यानंतर म्हणाला की, ‘मला तरी आनंद आहे की आम्ही मोठ्या फरकाने पराभूत झालो नाहीत आणि शेवटी हा स्कोअर फक्त 50 होता.’

ऋतुराज गायकवाडच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. या वक्तव्यासाठी चाहत्यांनी त्याला खडेबोल सुनावले आहेत. ‘मला अजूनही असं वाटतं की या खेळपट्टीवर 170 धावा खूप होत्या. फलंदाजी करणं कठीण होतं. पण खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्ही सामना गमावला. जेव्हा आम्ही 170 धावांचा पाठलाग करत असतो तर थोडा अधिक वेळ मिळाला असता. पण हे टार्गेट 20 धावांनी अधिक होतं. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळावं लागलं. आज आम्ही तसं काही करू शकलो नाही. खेळपट्टी संथ आणि चिकट झाली होती. त्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नव्हता. जेव्हा विजयी लक्ष्य 20 धावांनी अधिक असतं तेव्हा वेगाने खेळणं भाग पडतं. पण शेवटी आम्ही मोठ्या फरकाने हारलो नाही. हा फरक फक्त 50 धावांचा होता. आता गुवाहाटीचा लांबचा प्रवास करायचा आहे. त्यामुळे मानसिकरित्या तयार राहणं गरजेचं आहे. आम्ही चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. सर्वात जास्त क्षेत्ररक्षणात सुधारणा आवश्यक आहे. सर्वात आधी या क्षेत्रात पुनरागमन आवश्यक आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथिराना, खलील अहमद.