
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोमुळे चर्चांना उधाण आलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सर्वात मोठी डील होणार असंच सध्यातरी दिसत आहे. संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्स रवींद्र जडेजा आणि सॅम करनला सोडण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. या डीलची सर्वत्र चर्चा रंगली असताना एक ट्रेड मात्र एकदम शांततेत होत आहे. शांतीत क्रांती होत असल्याचं क्रीडाप्रेमींची भावना आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शार्दुल ठाकुर आणि अर्जुन तेंडुलकरच्या अदलाबदलीसाठी चर्चा सुरु आहे. ही ट्रेड म्हणता येणार नाही तर वेगवेगळं ट्रान्झेक्शन होऊ शकतं. क्रीकबझच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडू आपली फ्रेंचायझी बदलू शकतात. पण ऑल कॅश डीलच्या स्वरूपात हे होऊ शकतं. म्हणजेच दोघांची ट्रान्सफर एकमेकांवर अवलंबून आहे. दुसरीकडे, दोन्ही फ्रेंचायझीपैकी कोणी पहिला प्रस्ताव ठेवला हे मात्र अस्पष्ट आहे.
शार्दुल ठाकुर सध्या मुंबई संघाचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्व करत आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने त्या मागच्या पर्वात 2 कोटींच्या बेस प्राईसवर रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलं होतं. कारण मेगा लिलावात त्याला कोणीच भाव दिला नव्हता. त्याने मागच्या पर्वातील 10 सामन्यात 13 विकेट आणि 18 धावा केल्या होत्या. आयपीएल ट्रेड नियमानुसार, अधिकृत अदलाबदलीची घोषणा बीसीसीआयकडून केली जाते. त्यामुळे फ्रेंचायझी चिडीचूप आहेत. मुंबई क्रिकेट सर्कलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार शक्य आहे आणि याची अधिकृत घोषणा 15 नोव्हेंबरला खेळाडूंच्या रिटेन्शन आणि रिलीज लिस्टच्या घोषणेसह होऊ शकते.
अर्जुन तेंडुलकरला मेगा लिलावातील दुसऱ्या फेरीत 30 लाखांच्या बेस प्राईसवर मुंबई इंडियन्सने घेतलं होतं. त्याला घेण्यात तसं कोणी रस दाखवला नव्हता. पण मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी बोली लावली आणि घेतलं. मागच्या पर्वात अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत 5 सामने खेळला होता. यात त्याने 13 धावा देत 3 गडी बाद केले आहेत. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुन अष्टपैलू खेळी करत आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला त्याच्याकडून अपेक्षा असाव्यात असं दिसतंय. पण आता ही डील खरंच होते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.