
आयपीएल 2026 मिनी लिलावापूर्वी सर्व संघांना रिटेन्श यादी जाहीर करावी लागणार आहे. यासाठी 15 नोव्हेंबरची तारीख ठरली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना धावाधाव सुरु झाली आहे. रिटेन्शन यादी जाहीर करण्यापूर्वी फ्रेंचायझी ट्रेड विंडोच्या माध्यमातून काही खेळाडूंची अदलाबदल करण्याची खेळी जोर धरत आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून खेळाडूंसाठी यशस्वी ट्रेड केलं आहे. आता मोहम्मद शमीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आयपीएल स्पर्धेत मोहम्मद शमी सध्या सनरायझर्स हैदराबाद संघात आहे. मात्र त्याच्यासाठी दोन संघांनी फासे टाकले आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सची त्याच्यावर नजर आहे. त्यामुळे काव्या मारनच्या संघाकडे ट्रेड करण्याची मोठी संधी आहे. कारण मोहम्मद शमीसाठी दोन संघ मैदानात असल्याने चांगली रक्कम मिळू शकते.
आयपीएल 2025 मेगा लिलावात मोहम्मद शमीसाठी सनरायझर्स हैदराबादने 10 कोटी मोजले होते. मात्र त्याची कामगिरी काही खास राहिली नव्हती. त्याने या स्पर्धेत फक्त 6 विकेट घेतल्या होत्या. रिपोर्टनुसार, मोहम्मद शमी कोणत्या खेळाडूऐवजी देण्यापेक्षा कॅश डीलवर जोर असणार आहे. कारण सनरायझर्स हैदराबादमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. त्यामुळे संघाला तशी कोणाची गरज नाही. त्यामुळे मोहम्मद शमीची ट्रेड करून पैशांचं गणित सोडवू शकते. आता ही डील कशी होते हे येत्या काही तासात स्पष्ट होईल. लखनौ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकुरला रिलीज केलं आहे. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्याासाठी अनुभवी गोलंदाजाची गरज आहे.
मोहम्मद शमी 2013 पासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्याने मागच्या 12 वर्षात 119 सामने खेळले असून 133 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरीन 28.19 ची असून इकोनॉमी रेट हा 8.63 आहे. त्याने 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 2022 मध्ये 20 आणि 2023 मध्ये 28 विकेट काढल्या होत्या. मात्र मागच्या काही वर्षात त्याला दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे त्याच्या खेळावर परिणाम होत आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मात्र टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही.