MI vs SRH Pitch Report : वानखेडेत धावांचा महापूर येणार की गोलंदाज वरचढ ठरणार? खेळपट्टीमुळे कुणाचा फायदा होणार?

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Pitch Report Wankhede Stadium : वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांची साथ देणार की गोलंदाजांसाठी पूरक ठरणार? टॉस जिंकल्यानंतर आधी बॅटिंग घ्यायची की फिल्डिंग? जाणून घ्या.

MI vs SRH Pitch Report : वानखेडेत धावांचा महापूर येणार की गोलंदाज वरचढ ठरणार? खेळपट्टीमुळे कुणाचा फायदा होणार?
hardik pandya and abhishek sharma mi vs srh ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 16, 2025 | 10:43 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात 17 एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना आणखी एक महामुकाबला पाहायला मिळणार आहे. गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने असणार आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्लीचा विजयी रथ रोखला. तिलक वर्मा आणि रियान रिकेल्टन या मुंबईच्या फंलदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तर कर्ण शर्मा याने दिल्लीच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. तर दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबादनेही कमबॅक करत विजय मिळवला आहे. हैदराबादने पंजाबविरुद्ध विक्रमी 246 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि दुसरा विजय साकारला.

मुंबई-हैदराबाद तिसर्‍या विजयासाठी सज्ज

हैदराबाद आणि मुंबई टीमने या मोसमात प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये सामना होणार असल्याने मुंबईला घरच्या चाहत्यांचा फुल्ल सपोर्ट असणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये कायम धावांचा पाऊस पाहायला मिळाला आहे. वानखेडेतील खेळपट्टीत कायम बाऊन्स असतो. त्यामुळे बॉल सहज बॅटवर येतो. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारण्यात फार संघर्ष करावा लागत नाही.

वानखेडे स्टेडियममध्ये याआधी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 430 धावा केल्या. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 221 धावा केल्या. मुंबईने प्रत्युत्तरात या धावांचा शानदार पाठलाग केला. मात्र पलटणचे प्रयत्न कमी पडले. मुंबईला 209 धावांपर्यंतच पोहचता आलं.

वानखेडे स्टेडियममधील आकडेवारी

वानखेडे स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण 118 आयपीएल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या 118 पैकी पहिल्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाचा 55 वेळा विजय झाला आहे. तर दुसऱ्या डावात बॅटिंग करणारी टीम 63 वेळा यशस्वी ठरली आहे. आकडेवारीनुसार, वानखेडेत टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. वानखेडे स्टेडियममधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 170 इतकी आहे. आरसीबीने या मैदानात 2015 साली मुंबईविरुद्ध 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे या मैदानात 200 पेक्षा अधिक धावाही होऊ शकतात, हे देखील स्पष्ट होतं.

मुंबई आणि हैदराबादच्या गोटात एकसेएक आणि तोडीसतोड फलंदाज आहेत. हैदराबादने ते काय करु शकतात? हे राजस्थान विरूद्धच्या सामन्यात दाखवून दिलं. तर मुंबईचे फलंदाजही कमी नाहीत. त्यामुळे गुरुवारी कोण वरचढ ठरतं? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.