ENG vs IND : सिराज टीममध्ये.., कर्णधार शुबमन चित्तथरारक विजयानंतर मॅजिक मियाँबाबत काय म्हणाला? पाहा व्हीडिओ

Shubman Gill On Mohammed Siraj Post Match Presentation ENG vs IND 5th Test : भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराज याने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. सिराजने यासह भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.

ENG vs IND : सिराज टीममध्ये.., कर्णधार शुबमन चित्तथरारक विजयानंतर मॅजिक मियाँबाबत काय म्हणाला? पाहा व्हीडिओ
Shubman Gill On Mohammed Siraj Post Match Presentation
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 04, 2025 | 6:19 PM

प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असल्यावर काहीही अशक्य नसतं हे भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी दाखवून दिलं. भारताने करो या मरो सामन्यात इंग्लंडला विजयसाठी 374 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडसाठी या धावांचा पाठलाग करताना जो रुट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी वैयक्तिक शतकं झळकावली. तसेच या जोडीने चौथ्या विकेट्स 195 ची पार्टनरशीप करत इंग्लंडला 300 पार पोहचवलं. त्यामुळे भारतीय संघाने सामन्यासह मालिका गमावली, असं चाहत्यांना वाटू लागलं होतं. मात्र मियाँ मँजिक अर्थात मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने कमाल केली. या दोघांनी शानदार बॉलिंग करत इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. भारताने यासह या विजयासह 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली.

भारताच्या या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या थरारक विजयानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. स्टेडियममध्ये खेळाडू आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांनाही आनंद साजरा केला. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही मालिका बरोबरीत सोडवली. शुबमनची ही कर्णधार म्हणून पहिलीच मालिका ठरली. शुबमनने या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. मात्र शुबमनने सिराजचा आवर्जून उल्लेख केला.

शुबमन सिराजबाबत काय म्हणाला?

“मोहम्मद सिराजसारखा गोलंदाज असावा हे प्रत्येक कर्णधाराचं स्वप्न आहे. सिराजने पाच कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येक बॉल आणि स्पेलमध्ये सर्वस्व पणाला लावलं. प्रत्येक संघाला आणि कर्णधाराला सिराजसारखा खेळाडू हवा असतो. सिराज टीममध्ये आहे हे आमचं भाग्य आहे”, असं म्हणत शुबमनने सिराजचं भरभरुन कौतुक केलं.

शुबमनकडून सिराजचं कौतुक

पाचव्या सामन्यात एकूण 9 विकेट्स

दरम्यान मोहम्मद सिराजने या पाचव्या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. सिराजने पहिल्या डावात 16.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात सिराजने 30.1 ओव्हरमध्ये 104 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स मिळवल्या. सिराजने अशाप्रकारे भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. तसेच सिराजने या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा बहुमान मिळवला. सिराजने या मालिकेत एकूण आणि 23 विकेट्स घेतल्या.