‘माझी पत्नी तुझा उल्लेख…’, रोहित शर्माने राहुल द्रविडबाबत केला खुलासा
भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड ही जोडी कायम स्मरणात राहील. या जोडीने भारतीय क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आहे. आता रोहित शर्माने कृतज्ञता व्यक्त करताना त्याच्या मार्गदर्शनाचे कौतुक केलं आहे.

टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आपल्या पदावरून पायउतार झाला आहे. त्याच्या कारकिर्दित भारतीय संघाने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. टी20 वर्ल्डकप आणि आशिया चषकावर नाव कोरलं. तर वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्न शेवटच्या टप्प्यात भंगलं. मात्र यामागे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांची मेहनत कामी आली. दोघांनी टीम बांधणीपासून रणनितीची आखणी करत भारतीय संघाला एका उंचीवर नेलं. आता राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला असून कर्णधार रोहित शर्माने त्याची मनापासून प्रशंसा केली आहे. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, “मी यावर माझ्या भावना योग्यरित्या व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण तसं काही मिळेल याची मला खात्री नाही. पण माझा एक प्रयत्न आहे.”
“माझ्या लहानपणापासून मी कोट्यवधी लोकांसारखं तुझ्याकडे पाहिलं आहे. पण इतक्या जवळून काम केल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो. या खेळात तुम्ही दिग्गज आहात. पण तुम्ही सर्व बिरुदं मागे टाकून प्रशिक्षक म्हणून आलात. तुमच्याशी बोलताना कधीच वेगळेपणा वाटला नाही. तुमचा नम्र स्वभाव या खेळावरील प्रेम दाखवतो. मी तुमच्याकडून खुप काही शिकलो आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या स्मरणात राहील. माझी पत्नी तुमचा उल्लेख वर्क वाईफ असा करते. मी भाग्यवान आहे की तुम्हाला असं बोलण्याची संधी मिळाली.”, असं रोहित शर्मा पुढे म्हणाला.
View this post on Instagram
“आपल्या कारकिर्दितून एक गोष्ट गायब होती आणि मी खूप आनंदी आहे की आपण एकत्रितपणे मिळवू शकलो. राहुल भाई, तुम्हाला माझे विश्वासू, माझे प्रशिक्षक आणि माझे मित्र म्हणणे माझ्यासाठी सौभाग्य आहे.”, असंही रोहित शर्मा याने पुढे सांगितलं. दरम्यान, राहुल द्रविड आयपीएल स्पर्धेत दिसण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक होऊ शकतो असं बोललं जात आहे. गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर हे पद रिक्त होणार आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे.
