NZ vs AUS : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेआधी दुखापतीचं ग्रहण, न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ
New Zealand vs Australia T20i Series : न्यूझीलंड ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. त्याआधी न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यूझीलंडच्या अनेक खेळाडुंना दुखापत झालीय.

ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे सीरिजमधील तिसरा आणि अंतिम सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने यासह दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्वीप करण्यापासून रोखलं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 3 टी 20I सामने होणार आहेत. या मालिकेला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी यजमान न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
न्यूझीलंडच्या 1-2 नाही तर तब्बल 4 खेळाडूंना दुखापत झाली आहे. यामध्ये उपकर्णधार मिचेल सँटनर याचाही समावेश आहे. न्यूझीलंडच्या एका खेळाडूच्या पायाला दुखापत झालीय. तर एकाच्या पाठीला त्रास आहे. तर कॅप्टनसह दोघांना सारखाच त्रास आहे. त्यामुळे हे चौघे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळतील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विलियम ओ रुर्के याला पाठीतील दुखापतीमुळे 3 महिने क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडची डोकेदुखी वाढली आहे.
तिघांना दुखापत, दोघांना सारखाच त्रास
तर विलियमआधी ग्लेन फिलिप्स, फिन एलन आणि मिचेल सँटनर या तिघांनाही दुखापतीने ग्रासलं आहे. सँटनर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेत नेतृत्व करणार आहे. मात्र सँटनरला ग्रोईन इंजरीचा त्रास आहे. तसेच सँटनरवर शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र सँटनर टी 20I मालिकेआधी फिट होईल, असं म्हटलं जात आहे.
ग्लेन फिलिप्स यालाही ग्रोईन इंजरीचा त्रास आहे. तर फिन एलन याच्या पायाला दुखापत झालीय. त्यामुळे या दोघांना टी 20I मालिकेला मुकावं लागू शकतं. त्यामुळे विलियम ओ रुर्के, ग्लेन फिलिप्स आणि फिन एलन हे तिघे नसणं न्यूझीलंडसाठी अडचणीचं ठरु शकतं.
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार, 1 ऑक्टोबर
दुसरा सामना, शुक्रवार, 3 ऑक्टोबर
तिसरा सामना, शनिवार, 4 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौरा
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यात फक्त टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे.दुसरा सामना शुक्रवारी 3 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. तर 4 ऑक्टोबरला तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. हे तिन्ही सामने बे ओव्हल, माउंट मौंगानुई येथे होणार आहेत.
