
दक्षिण आफ्रिकेने चौथ्या आणि करो या मरो अशा टी 20i सामन्यात यजमान न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेतील आव्हान कायम राखलं आहे. दक्षिण आफ्रिकेने या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर यजमान न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकून मालिका विजयाचा दावा मजबूत केला होता. त्यामुळे न्यूझीलंडला विजयी हॅट्रिकसह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्या स्थितीत विजय मिळवणं बंधनकारक होतं. दक्षिण आफ्रिकेने या अशा अटीतटीच्या सामन्यात मैदान मारत आपलं आव्हान कायम राखलं आहे. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे.
उभयसंघातील चौथ्या सामन्याचं आयोजन हे वेलिंग्टनमध्ये करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 19 धावांनी आपल्या नावावर केला.
दक्षिण आफ्रिकेने वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियममध्ये पहिले बॅटिंग करताना 8 पेक्षा अधिकच्या रनरेटने धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कॉनर एस्टरह्यूजेन याने सर्वाधिक धावा केल्या. कॉनरने त्याच्या कारकीर्दीतील चौथ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली. कॉनरने या सामन्यात टी 20i कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं.
कॉनरने 36 बॉलमध्ये 57 रन्स केल्या. कॉनरने या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार लगावले. तसेच कॉनर व्यतिरिक्त रुबिन हरमन याने 28 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनी छोटेखानी खेळी केली. तर न्यूझीलंडसाठी कायले जेमीसन याने 2 विकेट्स मिळवल्या.
त्यानंतर न्यूझीलंड टीम 165 धावांचा पाठलाग करायला मैदानात आली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. न्यूझीलंडचं 18.5 ओव्हरमध्ये 145 रन्सवर पॅकअप झालं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे न्यूझीलंडला सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं.
दक्षिण आफ्रिकेसाठी गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर ओटनील बार्टमॅन, कॅप्टन केशव महाराज आणि प्रेनेलन सुब्रायन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर वियान मुल्डर याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
कॉनरचा त्याच्या कारकीर्दीतील चौथा आंतरराष्ट्रीय सामना होता. या युवा फलंदाजाने बॅटिंगसह फील्डिंगनेही योगदान देत दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली.