SL vs BAN : बांगलादेशवर 11 धावांनी मात, पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, टीम इंडिया विरुद्ध भिडणार

Pakistan vs Bangladesh Super 4 Match Result Asia Cup 2025 : पाकिस्तानने सुपर 4 फेरीतील आपल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 11 धावांनी मात केली आणि अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत.

SL vs BAN : बांगलादेशवर 11 धावांनी मात, पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, टीम इंडिया विरुद्ध भिडणार
Pakistan Cricket Team
Image Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images
| Updated on: Sep 26, 2025 | 12:48 AM

आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तानने बी ग्रुपमधील बांगलादेशवर विजय मिळवला आहे. पाकिस्तानने बांगलादेशसमोर 136 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशला या धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 124 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 135 धावांचा यशस्वी बचवा करत हा सामना 11 धावांनी जिंकला. पाकिस्तानने यासह अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे आता साखळी, सुपर 4 नंतर तिसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. या दोन्ही संघात रविवारी 28 सप्टेंबरला आशिया कप ट्रॉफीसाठी महामुकाबला होणार आहे.

खरंतर बांगालदेशसाठी 136 धावांचं आव्हान फार अवघड नव्हतं. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत बांगलादेशला विजयी धावांपर्यंत पोहचू दिलं नाही. बांगलादेशकडून शमीम होसैन याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. शमीमने सर्वाधिक 30 धावा केल्या. शमीम व्यतिरिक्त बांगलादेशच्या इतर सर्व फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.

शमीमशिवाय बांगलादेशसाठी सैफ हसन याने 18 धावांचं योगदान दिलं. नुरुल हसन आणि रिशान होसैन या दोघांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. मेहदी हसन याने 11 धावा जोडल्या. तर तंझीम साकिबने 10 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानसाठी शाहीन अफ्रिदी आणि हरीस रौफ ही जोडी यशस्वी ठरली. या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. सॅम अयुबने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद नवाझ याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

पाकिस्तानची बॅटिंग

त्याआधी बांगलदेशने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. पाकिस्तानसाठी मोहम्मद हारीस याने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर मोहम्मद नवाझ याने 25 धावांतं योगदान दिलं. कॅप्टन सलमान आघा आणि शाहिन आफ्रीदी या जोडीने प्रत्येकी 19-19 धावा केल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे पाकिस्तानला 135 धावांपर्यंत पोहचता आलं. बांगलादेशसाठी तास्किन अहमद याने 3 विकेट्स मिळवल्या. मेहदी हसन आणि रिषाद हौसेन या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मुस्तफिजुरने 1 विकेट मिळवली.

फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार

दरम्यान आता अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघ पुन्हा एकदा भिडणार आहे. दोन्ही संघ साखळी आणि सुपर 4 फेरीत आमनेसामने आले होते. भारताने दोन्ही वेळा पाकिस्तानला पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तानचा अंतिम फेरीत विजय मिळवत या 2 पराभवांची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर त्याटीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसर्‍यांदा आशिया चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.