
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर उपांत्य फेरीत पोहचणारा तिसरा संघ कोणता असणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. इंग्लंडने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडला पराभूत केलं. त्यामुळे न्यूझीलंडच्या सेमी फायनलच्या मोहिमेला झटका बसला. तर पाकिस्तानचं आव्हान कायम राहिलं. आता शनिवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तानने सुपर 8 मधील आपल्या तिसऱ्या आणि करो या मरो सामन्यात यजमान श्रीलंकेसमोर 213 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 212 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर श्रीलंकेला 147 धावांपर्यंत रोखावं लागणार आहे.
न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. तर न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.390 असा आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी नेट रनरेटचं समीकरण जुळवावं लागणार आहे. पाकिस्तानने आता 212 धावा केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेला 147 धावांच्या आत रोखलं तर पाकिस्तानच नेट रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त होईल. पाकिस्तान अशाप्रकारे 3 गुणांसह उपांत्य फेरीत पोहचेल. तर न्यूझीलंडचं आव्हान संपुष्टात येईल. मात्र तसं झालं नाही तर पाकिस्तानचा जिंकूनही काहीच फायदा होणार नाही. श्रीलंकेने 148 धावा केल्या तर न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे श्रीलंकेने 148 धावा कराव्यात, अशी पार्थना न्यूझीलंडचे खेळाडू करत असतील. तर इथे पाकिस्तानच्या गोलंदाजांचा श्रीलंकेला 147 रन्सआधी रोखायचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता या सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी फखर झमान आणि साहिबजादा फरहान या दोघांनी 176 धावांची सलामी भागीदारी केली. फखर आऊट झाल्याने ही जोडी फुटली. फखरने 84 रन्स केल्या. तर साहिबजादा फरहान याने शतक झळकावलं. साहिबदाजा 100 धावा करुन आऊट झाला.
पाकिस्तानच्या सलामी जोडीने कडक सुरुवात दिली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या करुन सामन्यावर घट्ट पकड मिळवायची संधी गमावली. श्रीलंकेने पाकिस्तानला शेवटच्या 12 चेंडूत 14 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानला श्रीलंकेसमोर 8 विकेट्स गमावून 212 धावाच करता आल्या. आता या सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.