
पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तडकाफडकी एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलला आहे. पीसीबीने मोहम्मद रिझवान याची एकदिवसीय कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली आहे. तर माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याचा जावई आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे क्रिकेट चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.
इस्लामाबादमध्ये पीसीबी निवड समिती आणि वनडे- टी 20i कोच माईक हेसन यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मोहम्मद रिझवान याला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शाहिनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र पीसीबीने असा तडकाफडकी निर्णय का घेतला? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
रिझवानला कर्णधारपदावरुन कशामुळे हटवण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच रिझवाननेही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या बैठकीत मुख्य प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. मात्र कुणा एकाच्या सांगण्यावरुन कर्णधारपद काढण्यात आलेलं नाही.
शाहिनची कर्णधारपदी नियुक्ती करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. शाहिनने याआधी पाकिस्तानच्या टी 20i संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र शाहिनला काही खास करता आलं नव्हतं. शाहिनच्या नेतृत्वात पाकिस्तानचा 5 सामन्यांच्या मालिकेत 1-4 अशा एकतर्फी फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे आता शाहिन एकदिवसीय कर्णधार म्हणून किती यशस्वी ठरेल? याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वेगवान गोलंदाजाकडे एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी
A change at the top as Pakistan announce a new ODI captain 🙌https://t.co/rmYofcQhM3
— ICC (@ICC) October 21, 2025
रिझवानने पाकिस्तानचं एकूण 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलं. रिझवानने पाकिस्तानला 9 सामन्यांमध्ये विजयी केलं. तर 11 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसेच रिझवानने कर्णधार म्हणून 41.67 च्या सरासरीने एकूण 625 धावा केल्या होत्या. तसेच रिझवानने त्याच्याच नेतृत्वात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून दिली होती.
दरम्यान शाहिन आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.सध्या उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. पाकिस्तान या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यानंतर 3 टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. तर 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. शाहिन या मालिकेतून कर्णधार म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे.