Video : प्रॅक्टिस सेशनमध्येही बाबर आझमचा डबा गूल, झालं असं की चढला पारा

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, या सामन्यात बाबर आझम सपशेल फेल ठरला होता. पण प्रॅक्टिस सेशनमध्येही चित्र काही वेगळं नव्हतं.

Video : प्रॅक्टिस सेशनमध्येही बाबर आझमचा डबा गूल, झालं असं की चढला पारा
| Updated on: Aug 28, 2024 | 8:41 PM

कसोटी क्रिकेटमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 विकेट्सने जिंकला. तसेच मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे सर्वच स्तरातून पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठली आहे. खासकरून पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. कारण या सामन्यात बाबर आझमची बॅट काही चालली नाही. गेल्या दिवसांपासून सुरु असलेली खराब कामगिरी कायम राहिली. पहिल्या डावात बाबर आझमला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात बाबर आझम फक्त 22 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे बाबर आझमच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या दरम्यान बाबर आझमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ट्रोलर्संना त्याला ट्रोल करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानंतर पाकिस्तानचा संघ जोरदार सराव करत आहे. बाबर आझमही नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहे. पण प्रॅक्टिस सेशनमध्येही बाबर आझम नको ते करून बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद गोलंदाजी करत होता. खुर्रम शहजादच्या गोलंदाजीवर बाबर आझम स्लिपला झेल देत बाद झाला. आऊट होताच बाबर आझमला राग अनावर झाला. त्याने चेंडूवर जोरात बॅट मारली. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्स त्याच्यावर निशाणा साधत आहेत. तसेच या व्हिडीओखाली विचित्र कमेंट्स टाकत आहेत.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना रावलपिंडी येथे होणार आहे. 30 ऑगस्टला या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना सुद्धा याच मैदानात झाला होता. तेव्हा पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. या मैदानात धावा करणं सोपं नाही हे पहिल्या सामन्यावरून स्पष्ट झालं आहे. या सामन्यात बाबर आझमने 80 धावा करताच 4 हजार धावांचा पल्ला गाठणार आहे. सध्याचा फॉर्म पाहता शक्य होईल का? असा प्रश्न आहे. या सामन्यात बाबर आझमची कसोटी लागणार आहे. जर या सामन्यात बाबर आझमने धावा केल्या नाही तर कसोटीतून पत्ता कापला जाऊ शकतो.