
भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली आहे. आशिया कप स्पर्धेत 3-0 ने मात दिली. त्यानंतर महिला क्रिकेट संघाविरुद्ध पाकिस्तानला 12-0 ने धूळ खावी लागली आहे. भारतीय महिला संघाविरुद्ध पाकिस्तानने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये एकही विजय मिळवलेला नाही. आयसीसी वुमन्स वनडे क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करत होता. भारताच्या रणरागिणींनी त्यांच्या नांग्या ठेचल्या. त्यांना संपूर्ण सामन्यात डोकंच वर काढू दिलं नाही. नाणेफेक गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने सर्व गडी गमवून 50 षटकात 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात पाकिस्तानने 43 षटकात सर्व गडी गमवून 159 धावा केल्या. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला.
पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने एकाकी झुंज दिली. तिने 106 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत 81 धावा केल्या. पण तिने केलेली एक कृती तिला महागात पडली आहे. 40 व्या षटकात भारतीय फिरकीपटू स्नेह राणाच्या गोलंदाजीवर सिद्रा अमिन बाद होत तंबूत परतली. यावेळी संघाला संकटातून बाहेर तर काढता आलं नाही. तसेच शतकही हुकलं. त्यामुळे सिद्रा अमीन नाराज होती. नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यामुळे बाद झाल्यानंतर तंबूत परतत असताना सिद्रा अमीनने जोरात बॅट मैदानावर मारली. तिची ही कृती आयसीसीला आवडली नाही. यासाठी सामनाधिकाऱ्यांनी सिद्रा अमिन शिक्षा सुनावली आहे.
आयसीसीने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबरला प्रेस रिलीज जाहीर करत शिक्षेबाबत स्पष्ट केलं आहे. सिद्रा अमीनने आयसीसीच्या नियम 2.2 चं उल्लंघन केल्याचं यात नमूद केलं आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यात क्रिकेटचं साहित्य किंवा कपडे, मैदनावरील उपकरणं आणि इतर साहित्यांसोबत केलेल्या गैरवर्तनाशी निगडीत आहे. सिद्रा अमीनने बाद झाल्यानंतर जोरात बॅट मैदानात आपटली. हा गुन्हा आयसीसी नियमाच्या लेव्हल 1 मध्ये येतो. यासाठी आयसीसीने अमीनला या कृतीसाठी फटकरालं आहे. तिच्या सामना फीमधून दंड आकारला नाही, पण तिला या कृतीसाठी डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.