
पाकिस्तान क्रिकेट टीमला आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेआधी मोठा झटका लागला. आयर्लंड क्रिकेट टीमने पहिल्या टी 20 सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. आयर्लंडने पाकिस्तानला पहिल्यांदाच टी 20 क्रिकेटमध्ये पराभूत केलं. पाकिस्तानने आयर्लंडला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. आयर्लंडने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आयर्लंडकडून ओपनर अँड्र्यू बालबर्नी याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. अँड्र्यू हा आयर्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. आयर्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आयर्लंडच्या या विजयानंतर कॅप्टन पॉल स्टर्लिंगने पाकिस्तानची सर्वांसमोर लाज काढली.
” मी या विजयानंतर फार आनंदी आहे. आम्हाला उन्हाळ्याची चांगली सुरुवात करायची होती. आमच्यासाठी हा योग्य दिवस होता. जेव्हा तुम्ही विशेष करुन पाकिस्तानवरुन येता, जिथे जगातील सर्वात सपट खेळपट्ट्या आहेत. त्यांना आधी बॅटिंगसाठी भाग राडा आणि पाहा ते काय करु शकतात”, असं म्हणत पॉल स्टर्लिंगने पाकिस्तानच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोललं”. “आम्ही 180 धावांचा पाठलाग करुन आनंदी आहोत. बालबर्नी याची अफलातून खेली, त्यांनी कमाल करुन दाखवली. आम्ही येथे पाकिस्तान विरुद्ध चांगलं खेळलो”, असं म्हणत पॉलने आनंद व्यक्त केला.
“तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पराभवाचं खापर हे फिल्डिंग आणि बॅटिंगवर फोडलं. 190 धावसंख्या योग्य ठरली असती. आम्ही फिल्डिंग आणि बॅटिंगमुळे पराभूत झालो. फिल्डिंगमधील काही चुका महागात पडल्या. मला असं वाटतं की आम्ही सुरुवातीच्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये आघाडीवर होतो. मात्र शेवटच्या 10 ओव्हरमध्ये मागे पडलो”, असं बाबरने म्हटलं.
आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाइट.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, फखर जमान, शादाब खान, आझम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अब्बास आफ्रिदी.