
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 पैकी 15 संघांची घोषणा करण्यात आली आहे. तर पाकिस्तानने 25 जानेवारीला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. पाकिस्तान यासह या स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा 16 वा देश ठरला आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी गेल्या वर्ल्ड कपच्या तुलनेत संघात एक दोन नाही तर तब्बल 7 बदल केले आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट बोर्डाने कर्णधारही बदलला आहे. पीसीबीने गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तुलनेत यंदा संघातून कुणाचा पत्ता कापलाय आणि कुणाला संधी दिलीय? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानची गेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली होती. बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तानचं साखळी फेरीतच पॅकअप झालं होतं. तसेच पाकिस्तानला तुलनेत नवख्या असलेल्या यूएसए संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता पीसीबीने हे बदल केले आहेत. निवड समितीने बाहर आझम या अनुभवी फलंदाजाला संघात कायम ठेवलंय. तर मोहम्मद रिझवान आणि हारिस रऊफ या अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
आझम खान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद रिझवान या खेळाडूंना वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान मिळालेलं नाही. हे 7 खेळाडू गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग होते.
तर फहीम अश्रफ, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद नवाझ, मोहम्मद सल्मान मिर्झा, साहिबझादा फरहान आणि उस्मान तारीक यांचा समावेश करण्यात आला आहे. या सातही खेळाडूंची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे.
पाकिस्तान टीमने गेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 4 सामने खेळले होते. पाकिस्तानला या 4 पैकी फक्त 2 सामन्यांतच विजय मिळवता आला होता. यूएसए आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर पाकिस्तानने कॅनडा आणि आयर्लंड या तुलनेत नवख्या संघावर विजय मिळवला होता.