क्रिकेट करिअर वाचवण्यासाठी पृथ्वी शॉने टाकले असे फासे, मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितलं की…

पृथ्वी शॉ याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला. मात्र आज त्याला संघात जागा मिळवणं कठीण झालं आहे. मुंबई निवड समितीने त्याला खराब फिटनेसमुळे रणजी स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. असं असताना पृथ्वी शॉ एक मोठा निर्णय घेण्याचा तयारी आहे.

क्रिकेट करिअर वाचवण्यासाठी पृथ्वी शॉने टाकले असे फासे, मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितलं की...
पृथ्वी शॉ
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 23, 2025 | 6:24 PM

मुंबई संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला सूचित केल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्याचा मन त्याने केलं आहे. यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं आहे. एमसीएच्या सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. सूत्रांनी सांगितलं की, ‘त्याने आमच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं आहे आणि आम्ही लवकरच याबाबत निर्णय घेऊ.’ पृथ्वी शॉला या महिन्याच्या सुरुवातील दोन-तीन राज्यांकडून ऑफर मिळाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये निवड समितीने त्याला संघातून डावलण्याचं कारण सांगत त्याला काही किलो वजन कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचं फिटनेस आणि फॉर्म पाहता निवड समितीने त्याला विजय हजारे ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. विजय हजारे ट्रॉफी डिसेंबर 2024 मध्ये झाली होती.

दरम्यान पृथ्वी शॉची एक सोशल मिडिया पोस्टही चर्चेत आली होती. त्यात त्याने लिहीलं होतं की ‘मला सांग देवा, मला अजून काय बघायचं आहे. मी 65 डावात 55.7 च्या सरासरीने 3399 धावा आणि 126 चा स्ट्राईक असूनही मी चांगला नाही. तुझ्यावर विश्वात ठेवत आहे आणि आशा आहे की तुम्हीही माझ्यावर विश्वास कराल. कारण मी निश्चितपणे परत येईन. ओम साई राम..’ पृथ्वी शॉ 2022 च्या विजय हजारे स्पर्धेनंतर भारतात लिस्ट ए सामने खेळला नाही. दरम्यान इंग्लंडमध्ये नॉर्थम्पटनशायर काउंटीसाठी खेळला होता.

मागच्या पर्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मध्य प्रदेशला पराभूत जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा या संघाची धुरा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर होती. तेव्हा त्याला पृथ्वी शॉबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने कठोर शब्दात पृथ्वी शॉला सुनावलं होतं. आता एमसीए त्याला एनओसी देते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जर एनओसी दिली तर कोणत्या राज्याकडून खेळणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यशस्वी जयस्वालही एनओसी मागत होता. पण त्यानंतर त्याने त्याचा निर्णय मागे घेतला.