मुंबई इंडियन्सच्या लक फॅक्टरबाबत आर अश्विनने केला खुलासा, 2018 मध्ये झालं असं की…
आयपीएल 2025 क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्सने धडक मारली आहे.मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. या सामन्यापूर्वी आर अश्विनने एक किस्सा शेअर केला आहे. यात मुंबई इंडियन्सच्या लक फॅक्टरबाबत सांगितलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने जेतेपदाकडे कूच केली आहे. यापू्र्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता सहाव्यांदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जेतेपदासाठी सरसावली आहे. एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सला 20 धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स संघ इथपर्यंत पोहोचला आहे. आता जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. असं असताना मुंबई इंडियन्सला कशी नशिबाची साथ मिळते याबाबतचा एक किस्सा आर अश्विनने सांगितला आहे. आर अश्विनने विमल कुमार यांच्या युट्यूब चॅनेलवर याबाबत खुलासा केला आहे. मुंबई इंडियन्ससोबत काय लक असल्याचं दिसून आले आहे. त्यासाठी आर अश्विनने 2018 आयपीएल स्पर्धेचं उदाहरण दिलं. तेव्हा आर अश्विनकडे पंजाब किंग्स संघाची धुरा होती.
आर अश्विनने सांगितलं की, ‘मी मुंबई इंडियन्सविरुद्ध कायम असं पाहीलं आहे. मी 2018 या वर्षातील एक किस्सा सांगू इच्छितो. तेव्हा पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होती. मी पंजाब किंग्सचा कॅप्टन होतो. त्या सामन्यात मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करत होती. 13 षटकात 80 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. मुंबई गेममध्ये नव्हती. तेव्हा अचानक वीज गेली आणि फ्लड लाइट बंद झाले. यामुळे खेळ 20 मिनिटांसाठी थांबला होता.’
Ashwin brutally owned MI 😭🤣 pic.twitter.com/AcJwd6OlhS
— ` (@virxj_18) May 31, 2025
‘लाईट आल्यानंतर किरोन पोलार्ड फलंदाजी करत होता. त्याने आक्रमक खेळी केली. त्याने मुंबईला 180 धावा कि 200 धावांपर्यंत पोहोचवलं. मला तेव्हा वाटलं असं कसं झालं यार.. मुंबई इंडियन्ससाठी असा ब्रेक मिळतो. त्यांना नशिबाची साथही मिळते. मला आता कुठे ना कुठे शोधावं लागेल की त्यांना हे लक येते कुठून.’ असं आर अश्विन म्हणाला. मुंबई इंडियन्स खूपच नशिबवान आहे असं आर अश्विनला या माध्यमातून सांगायचं आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 1 जून रोजी क्वॉलिफायर 2 चा सामना होणार आहे. या सामन्यात विजयी संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. मुंबई इंडियन्स या सामन्यात किती लकी ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
