“ट्रॅव्हिस हेडची विकेट…”, राहुल द्रविड वनडे वर्ल्डकप अंतिम फेरीतील दु:ख व्यक्त करत म्हणाला..
मुंबईत CEAT पुरस्कार सोहळ्यात दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राहुल द्रविडने वनडे वर्ल्डकप अंतिम फेरीतील महत्त्वाची बाब उघड केली.

भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला असला तरी वनडे वर्ल्डकप अंतिम पराभवाची सळ कायम आहे. कारण संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती. एकही सामना न गमवता अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून धुव्वा उडवला आणि भारताच्या पदरी निराशा पडली. या पराभवामुळे रोहित शर्मासारखा दिग्गज खेळाडूला अश्रू अनावर झाले. त्यामुळे ते दु:ख विसरणं कठीण आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. पण सहा महिन्यात टी20 वर्ल्डकप जिंकताच ही जखम काही अंशी भरून निघाली. टी20 वर्ल्डकप अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नशिबाने भारताला साथ दिली.
राहुल द्रविडने सांगितलं की, ‘मला यावर विचार करण्याचा वेळ मिळाला. आम्ही ज्या काही गोष्टी केल्या त्यावर विचार केला. कधी कधी वाटतं की यापैकी खूप साऱ्या गोष्टी करायला हव्यात. आपल्याला प्रक्रियेचं पालन करावे लागेल. सर्वकाही ठीक करावं लागेल. पण कधीकधी नशिबाची साथही असायला हवी असते. टी20 वर्ल्डकप अंतिम फेरीत 30 चेंडूत 30 धावा हव्या होत्या. रोहितने चांगली रणनिती अवलंबली. तसेच संयम ठेवला.’
डेविड मिलरची विकेट आणि सूर्यकुमारच्या कॅचचा उल्लेख राहुल द्रविडने केला. ‘आम्ही या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं नाही की आम्हाला काय करायचं आहे. पण आम्हाला एका अशा खेळाडूची गरज होती तो निश्चितपणे सीमेच्या आत करू शकेल. हे सुद्धा एक कौशल्य आहे.’ तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीचा उल्लेख करत म्हणाला की, भारत वनडे वर्ल्डकप अंतिम फेरीत ट्रेव्हिस हेडला आऊट करण्याचा जवळ होता. पण तो नशिबवान ठरला. त्याने मॅच विनिंग शतकी खेळी केली आणि भारताचं स्वप्न भंगलं.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात 240 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं होतं. ट्रेव्हिस हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 137 धावांची खेळी केली होती. सामना हातून गेल्यानंतर मोहम्मद सिराजने त्याची विकेट घेतली होती.
