IPL 2025 : आयपीएल स्पर्धेत राहुल द्रविड सुरु करणार नवीन इनिंग? या फ्रेंचायसीकडून संपर्क!
टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. आता राहुल द्रविड काय करणार असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. लवकरच राहुल द्रविड नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आता राहुल द्रविड ही ऑफर स्वीकारतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ टीम इंडियासाठी सुवर्णकाळ ठरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. तर आशिया कप आणि टी20 वर्ल्डकप 2024 जेतेपद मिळवलं. आता राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला असून या पदावर नव्या व्यक्तीची निवड होणार आहे. या पदासाठी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचं नाव आघाडीवर आहे. केकेआरचा मेंटॉर असताना गंभीरने संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता हीच भूमिका तो टीम इंडियात बजावणार असल्याची चर्चा आहे. अजूनही बीसीसीआयने त्याच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. गंभीरनंतर रिक्त होणाऱ्या जागेवर मेंटॉर म्हणून राहुल द्रविडला घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने तयारी केली आहे. राहुल द्रविडने यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी मेंटॉर म्हणून काम केलं आहे. त्याच्यासाठी हे पद काही नवीन नाही. त्यामुळे केकेआर द्रविडला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यासाठी पावलं उचलतं आहे.
मात्र याबाबत राहुल द्रविड याच्याकडून कोणताही निर्णय समोर आलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेली ऑफर स्वीकारली तर द ग्रेट वॉल नावाने ख्याती असलेला राहुल द्रविड कोलकाता नाईट रायडर्सला मार्गदर्शन करेल. आयपीएल 2025 स्पर्धेत राहुल द्रविड ही भूमिका बजावताना दिसेल. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आणि राजस्थान रॉयल्सकडून राहुल द्रविड एकूण 89 सामने खेळला आहे. यात राहुल द्रविडने 11 अर्धशतकांसह 2174 धावा केल्या आहेत. तसेच 2014 आणि 2015 या कालावधीत राजस्थान रॉयल्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्ससाठी मेंटॉरची भूमिका बजावताना दिसला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
दरम्यान, गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड येत्या काही दिवसात होईल, असं बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं आहे. श्रीलंका दौऱ्यात गौतम गंभीरच्या खांद्यावर ही सूत्र असतील. साडे तीन वर्षे गौतम गंभीर ही जबाबदारी सांभाळणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप असणार आहे. जर यात चांगली कामगिरी राहिली तर ऑलिम्पिकमध्येही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर राहू शकते.
