
आयपीएल 2025 स्पर्धेतील 50वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि मुंबई इंडियन्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्सने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रिकल्टन यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी जमली. या दोघांनी प्रत्येकी नाबाद 48 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 2 गडी गमवून 217 धावा केल्या आणि विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही राजस्थान रॉयल्सला गाठता आलं नाही. राजस्थान रॉयल्सला 117 धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. कारण आता उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तरी प्लेऑफचं गणित सुटणार नाही. चमत्कारही हे गणित सोडवू शकणार नाही.
राजस्थान रॉयल्स आतापर्यंत एकूण 11 सामने खेळला आहे. त्यापैकी 8 सामन्यात पराभव आणि 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत तळाशी गेला आहे. राजस्थान रॉयल्सचे एकूण 6 गुण आहेत. आता उर्वरित ती सामन्यात विजय मिळवला तरी 12 गुण होतील. आता टॉपला असलेल्या चार संघांचे 12 गुण आहेत. त्यामुळे हे गणित नेट रनरेटच्या आधारावरही सुटणं कठीण आहे.त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सचे 14 गुण आहेत. तर पंजाब किंग्सचे 13 गुण आहेत. त्यामुळे टॉप 4 मधील तीन स्थान तर असेच गेले आहेत. त्यामुळे चमत्कारही राजस्थानचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सचं स्पर्धेतील आव्हान खऱ्या अर्थाने संपुष्टात आलं आहे.
राजस्थान रॉयल्स स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी दोन संघांचं प्लेऑफचं गणित बिघडवू शकतो. एक संघ टॉप 4 मध्ये आहेत. तर एका संघाला प्लेऑफची जर तरची संधी आहे. पंजाब किंग्सचे 13 गुण आहेत. त्यामुळे उर्वरित चार पैकी दोन सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत राजस्थान विरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना 16 रोजी होणार आहे. अशीच काहीशी स्थिती कोलकाता नाईट रायडर्सची आहे.राजस्थानचा 4 मे रोजी कोलकात्याशी सामना आहे. या सामन्यातील विजय कोलकात्याला खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा विजय मिळवला नाही प्लेऑफचं गणित चुकेल.
राजस्थान रॉयल्सनंतर चेन्नई सुपर किंग्सचंही स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. या दोन्ही संघांमध्ये 12 मे रोजी सामना होणार आहे. या दोन्ही संघांच्या जयपराजयाचा तसा काही फटका बसणार नाही. पण प्रतिष्ठेची लढाई या बाद झालेल्या संघांमध्ये असेल.