Duleep Trophy 2025: रजत पाटीदारच्या नेतृत्वात जेतेपदाला गवसणी, अंतिम सामन्यात असं काही घडलं
दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सेंट्रल झोनने साउथ झोनचा 6 विकेट्स राखून पराभव केला. यासह दुलीप ट्रॉफीच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयात रजत पाटीदारचं नेतृत्व, यश राठोडच्या 194 धावा आणि सारांश जैनच्या 5 विकेट्स महत्त्वाच्या ठरल्या.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरुत पार पडला. या सामन्यात सेंट्रल झोन आणि साउथ झोन हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सेंट्रल झोनने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या डावात साउथ झोनला 149 धावांवर रोखलं.तसेच पहिल्या डावात 511 धावा करत विजय जवळपास पक्का केला. त्यानंतर साउथ झोनने दुसऱ्या डावात 426 धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात फक्त 64 धावांचं आव्हान सेंट्रल झोनला मिळालं. हे आव्हान सेंट्रल झोनने 4 गडी गमवून पूर्ण केलं. रजत पाटीदारने पुन्हा एकदा आपली नेतृत्वशक्ती दाखवली. आरसीबीने यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. आता त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये संघाला चॅम्पियन बनवले आहे.
सेंट्रल झोनचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला की, ‘प्रत्येक कर्णधाराला ट्रॉफी आवडतात. मी थोडा भाग्यवान आहे कारण माझ्याकडे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे, फक्त अंतिम सामन्यातच नाही तर गेल्या दोन सामन्यांमध्येही. तो ट्रॅक फलंदाजीसाठी पूर्णपणे चांगला होता, तिथेही आमच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि इतर फलंदाजांना अडचणीत आणले.‘
सामन्यात प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचं कारणही रजत पाटीदारने स्पष्ट केलं. रजत पाटीदार म्हणाला की, ‘ही विकेट थोडी कोरडी होती, म्हणून आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पहिल्या डावात लवकर बाद करणं आमचे ध्येय होते आणि त्यामुळे हा खेळ सोपा झाला. आम्ही अंदाज लावला होता की वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल पण ते कसे प्रतिसाद देत आहे हे पाहण्यासाठी मला फिरकी गोलंदाजांना एक षटक द्यावे लागले. वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळाली.‘
सारांश जैनला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सारांश जैनने सांगितले की, ‘मी दोन्हीवर खूश आहे. पण माझ्या गोलंदाजीने जास्त खूश आहे. अंतिम सामन्यात पहिल्या डावात 5 विकेट काढणे हे विशेष होते. आजच्या पिढीत, तुम्ही फक्त आघाडीचा गोलंदाज म्हणून खेळू शकत नाही, तुम्हाला बॅटने योगदान द्यावे लागते. आमची योजना स्टॉक बॉल टाकण्याची होती, आम्ही विकेट वाचली आणि त्यानुसार नियोजन केले. आम्ही चांगले नियोजन केले आणि नंतर अंमलात आणले.‘
