
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका अपेक्षेप्रमाणे 2-0 ने जिंकली. दुसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात जिंकला. भारताने दुसऱ्या डावात 3 गडी गमवून 121 धावांचं आव्हान गाठलं. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार कुलदीप यादव ठरला. तर मालिकावीराचा पुरस्कार रवींद्र जडेजाला मिळाला. मालिकावीराच्या पुरस्कारानंतर रवींद्र जडेजाने आपल्या भावना व्यक्त केल्या. इतकंच काय तर टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रवींद्र जडेजाने शुबमन गिलच्या निर्णयावर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली आहे. रवींद्र जडेजाने सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर सांगितल की, त्याला गोलंदाजीच्या अधिक संधी देता आल्या असत्या. आर अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर रवींद्र जडेजाला षटकं टाकण्याची जास्तीत जास्त संधी मिळणं अपेक्षित होतं. पण त्याला तसं काही मिळालं नाही.
रवींद्र जडेजाने सांगितलं की, ‘मला षटकं टाकण्याची आणखी जास्त संधी मिळायला हवी. पण आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहोत. बॅटिंग आणि फलंदाजीत आम्ही चांगली कामगिरी केली आहे. मागच्या पाच सहा महिन्यात आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत त्यामुळे खूश आहे. हे टीमसाठी चांगले संकेत आहेत.’ इतकंच काय तर गौतम गंभीरने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिल्याने फलंदाज म्हणून जबाबदारी घेण्याचा विचार करत असल्याचं देखील सांगितलं.
रवींद्र जडेजाने फलंदाजीच्या क्रमवारीबाबत सांगितलं की, ‘मी आता सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यामुळे मी एका फलंदाजाप्रमाणे विचार करत आहे. हे माझ्यासाठी काम करत आहे. मागच्या काही वर्षात मी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळत होतो. तेव्हा माझी विचार करण्याची पद्धत काही वेगळी होती. मी खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करतो. प्रमाणिकपणे सांगायचं तर मी रेकॉर्डबाबत फार काही विचार करत नाही. मी फक्त टीमसाठी चांगलं काय ते देण्याचा प्रयत्न करतो.’ रवींद्र जडेजाने तिसऱ्यांदा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे संघातून डावललं आहे.