
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील 50 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थानचा 100 धावांनी धुव्वा उडवला आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला 16.1 ओव्हरमध्ये 117 धावांवर गुंडाळलं. मुंबईने अशाप्रकारे जयपूरमध्ये 2012 नंतर पहिला विजय मिळवला. मुंबईचा हा या 18 व्या मोसमातील सलग सहावा तर एकूण सातवा विजय ठरला. तर राजस्थानचा हा आठवा पराभव ठरला. राजस्थान या पराभवासह आयपीएलच्या 18 व्या मोसमातून बाहेर पडणारी चेन्नई सुपर किंग्सनंतर दुसरी टीम ठरली.
राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी 218 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदनात आली. मात्र ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर राजस्थानला झटका दिला. गुजरात विरुद्धचा मॅचविनर शतकवीर वैभव सूर्यवंशी याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला पावर प्लेमधील पहिल्या 6 ओव्हरमध्ये 5 झटके दिले.
वैभवनंतर यशस्वी जयस्वाल 13, नितीश राणा 9 आणि कर्णधार रियान पराग याने 16 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर शिमरॉन हेटमायर याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे राजस्थानची 4.5 ओव्हरमध्ये 5 आऊट 47 अशी स्थिती झाली. त्यानंतर राजस्थानची आणखी वाईट स्थिती झाली. शुबम दुबे 15 धावा करुन आऊट झाला. ध्रुव जुरेल याने 11 रन्स केल्या. महीश तीक्षना आणि कुमार कार्तिकेय या दोघांनी प्रत्येकी 2 धावा केल्या. तर जोफ्रा आर्चर याने राजस्थानसाठी सर्वाधिक 30 धावांचं योगदान दिलं. जोफ्राने 27 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. जोफ्राने केलेल्या या खेळीमुळे राजस्थानला 100 पार मजल मारता आली. तसेच जोफ्राने या खेळीसह काही वेळ सामना खेचून ठेवला. त्यामुळे मुंबईला विजयासाठी प्रतिक्षा करावी लागली. मात्र अखेर मुंबईने विजय मिळवला.
मुंबईसाठी ट्रेंट बोल्ट आणि कर्ण शर्मा या जोडीने प्रत्येकी आणि सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कर्णधार हार्दिक पंड्या आणि दीपक चाहर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
मुंबईचा विजयी ‘सिक्सर’
One to remember for Ryan Rickelton 💙
A flying start with the bat earns him his first Player of the Match in #TATAIPL 💪
Scorecard ▶ https://t.co/t4j49gXHDu#RRvMI | @mipaltan pic.twitter.com/DGP9Cm4Wu8
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगासाठी बोलावलं. मुंबईने या संधीचा फायदा घेतला. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने 116 धावांची भागीदारी केली. रायनने 61 धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने 53 धावांचं योगदान दिलं. तर त्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी केली. सूर्या आणि हार्दिक या दोघांनी प्रत्येकी 23 चेंडूत प्रत्येकी 48 धावा केल्या.