RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?

Vaibhav Sooryavanshi RR vs RCB IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा स्टार आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 19 व्या मोसमात जवळपास 250 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. त्यामुळे वैभवचा आरसीबी विरुद्धही तोच झंझावात कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.

RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?
Vaibhav Sooryavanshi RR IPL 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 10, 2026 | 5:10 PM

वैभव सूर्यवंशी याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातून वयाच्या 14 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केलं. वैभवने पहिल्याच मोसमात वादळी शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाही तर वैभव वेगवान शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. वैभवने हाच तडाखा 19 व्या मोसमातही कायम ठेवला आहे. राजस्थानने या 19 व्या मोसमात पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. वैभवने राजस्थानला विजयी करण्यात योगदान दिलं आहे. वैभवने पहिल्या 3 सामन्यांत फटकेबाजी करत चाहत्यांची मनं जिकंली.

राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादला पराभूत करुन विजयी सलामी दिली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन सलग दुसरा विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत राजस्थानने विजयी हॅट्रिक पूर्ण केली. आता राजस्थानसमोर चौथ्या सामन्यात गतविजेता आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. वैभवने आरसीबी विरुद्ध जुना हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.

राजस्थान 10 एप्रिलला शुक्रवारी 19 व्या मोसमातील 16 व्या आणि आपल्या मोहिमेतील चौथ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध 2 हात करणार आहे. राजस्थान आपल्या घरच्या मैदानात आरसीबी विरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चाहत्यांचं या सामन्यानिमित्ताने वैभवसह यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली या तिघांच्या बॅटिंगकडे लक्ष असणार आहे.

वैभव आरसीबी विरुद्ध चमक दाखवणार?

वैभव गेल्या मोसमात मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात ढेर झाला होता. वैभवला पलटण विरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. मात्र वैभवने गेल्या सामन्यात मंगळवारी मुंबई विरुद्ध 14 चेंडूत 39 धावा कुटल्या. वैभवने अशाप्रकारे मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. आता वैभव तोच तडाखा आरसीबी विरुद्ध कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? याकडे लक्ष असणार आहे.

वैभवला गेल्या मोसमात आरसीबी विरुद्ध 24 एप्रिलला झालेल्या सामन्यात आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र भुवनेश्वरने वैभवला 16 धावांवर बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे आता वैभवचा या सामन्यात मोठी खेळी करुन गेल्या सामन्यातील भरपाई करण्याचा प्रयत्न असणार आहे. वैभव या प्रयत्नात किती यशस्वी ठरतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

वैभवची 19 व्या मोसमातील कामगिरी

दरम्यान वैभव सूर्यवंशी 19 व्या मोसमात आतापर्यंत राजस्थानसाठी तिन्ही सामने खेळला आहे. वैभवने या 3 सामन्यांत 1 अर्धशतक, 11 षटकार आणि 10 चौकारांसह एकूण 122 धावा केल्या आहेत.

Follow Us