Cricket: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघाकडून खेळणार, इंग्लंडमध्ये रंगणार सामने
इंग्लंडमधून महत्वाची बातमी समोर आली आहे.भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघाकडून खेळणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडलेले आहेत, त्यामुळे या दोन्ही देशांचे क्रिकेट संघ कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. हे देश फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच एकमेकांशी भिडतात. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांकडे सर्वांचे लक्ष असते. आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंना बंदी आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना एकाच संघात एकत्र खेळताना पाहणे हे देखील दुर्मिळ झाले आहे. मात्र आता इंग्लंडमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.
भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघात
मिळालेल्या माहितीनुसार, यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने पाकिस्तानी फलंदाज अब्दुल्ला शफीकला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून शफीक संघात सामील होणार आहे. तो काउंटी चॅम्पियनशिपच्या दोन महत्त्वाच्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच तो टी20 ब्लास्टच्या शेवटच्या चार सामन्यांमध्येही यॉर्कशायरकडून खेळणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यात यॉर्कशायर या संघाने भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडला करारबद्द केले आहे. त्यामुळे ऋतुराज देखील यॉर्कशायरकडून खेळणार आहे. भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 1 मध्ये यॉर्कशायरकडून खेळणार आहे. तो 5 काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती समोर आली आहे. तसेच ऋतुराज 5 ऑगस्टपासून सुरू होऊन 20 सप्टेंबरपर्यंत खेळल्या जाणाऱ्या वनडे कपमध्येही यॉर्कशायरकडून खेळणार आहे.
मात्र भारत आणि पाकिस्तानचे हे दोन खेळाडू एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता नाही. कारण या दोन्ही खेळाडूंना वेगवेगळ्या सामन्यांसाठी संघात सामील करण्यात आले आहे. म्हणजेच दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या सामन्यांसाठी यॉर्कशायरकडून खेळणार आहे.
अब्दुल्ला शफीक काय म्हणाला?
यॉर्कशायरने करारबद्ध केल्यानंतर अब्दुल्ला शफीकने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, ‘यॉर्कशायरसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी संघात सामील होण्यास मी उत्सुक आहे. हा क्लब ऐतिहासिक आहे आणि मला आशा आहे की मी संघासाठी चांगली कामगिरी करेल.