SA vs AFG: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 सुपर ओव्हर, कसं काय घडलं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आणि रोमांचक सामने होणार नाही असं कसं होईल. त्याची प्रचिती स्पर्धेच्या 13व्या सामन्यात आली. या सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात एक सोडून दोन सुपर ओव्हर झाल्या. कसा रंगला थरार ते जाणून घ्या.

SA vs AFG: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 सुपर ओव्हर, कसं काय घडलं ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 सुपर ओव्हर
Image Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Feb 11, 2026 | 3:48 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 13 व्या सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि अफगाणितास्तान यांच्यात लढत झाली. नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 20 षटकात 6 गडी गमवून 187 धावा केल्या. तसेच विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना 19.4 षटकात अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 187 धावांची खेळी केली. यामुळे हा सामना ड्रॉ झाला. तसेच निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता होती. मात्र येथेही सामना रंगतदार झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये काही निकाल लागला नाही. त्यासाठी दुसरी सुपर ओव्हर टाकावी लागली. अखेर दक्षिण अफ्रिकेच्या वाटेला यश आणि विजय मिळवला. अखेर पहिल्या आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये काय झालं ते जाणून घ्या

सुपर ओव्हर 1

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर ओव्हरमध्ये पहिली फलंदाजी अफगाणिस्तानच्या वाटेला आली. लुंगी एनगिडी षटक टाकण्यासाठी आला आणि सलमीला अझमत आणि गुरबाज आले. अझमतने स्ट्राईक घेतली. पहिल्या चेंडूवर त्याने चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेत गुरबाजला स्ट्राईक दिली. गुरबाजने पुन्हा 1 धाव घेतली. स्ट्राईकला अझमत आला आणि चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेण्यात अझमतला यश आलं. या षटकात एकूण 17 धावा आल्या आणि 18 धावांचं लक्ष्य दिलं गेलं.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मिलर आणि ब्रेव्हिस ही जोडी मैदानात आली. तर फारूकीच्या हाती षटक सोपवलं गेलं. मिलरने पहिल्या चेंडूवर 1 धाव घेत ब्रेव्हिसला स्ट्राईक दिली. ब्रेव्हिस स्ट्राईकला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. पण तिसऱ्या चेंडूवर त्याची विकेट गेली. चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्टब्स आला आणि त्याने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर धाव आली नाही. शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज होती. तर बरोबरी करण्यासाठी 6 धावा आवश्यक होत्या. स्टब्सने षटकार मारला आणि सामना बरोबरीत सुटला.

सुपर ओव्हर 2

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजीसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ आला. स्टब्स आणि मिलर जोडी उतरली. अझमतच्या हाती अफगाणिस्तानने चेंडू सोपवला होता. स्टब्सने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दुसर्‍या चेंडूवर 1 धाव घेत मिलरला स्ट्राईक दिली. मिलरने तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या- पाचव्या चेंडूवर सलग दोन षटकार मारले. तर सहाव्या चेंडूवर 2 धावा काढल्या. या षटकात एकूण 23 धावा आल्या आणि विजयासाठी 24 धावांचं आव्हान दिलं.

दक्षिण अफ्रिकेने हे षटक केशव महाराजच्या हाती सोपवलं. मोहम्मद नबी स्ट्राईकला होता. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवर नबी बाद झाला. तिसऱ्या चेंडूचा सामना करमअयासाठी गुरबाज मैदानात आला आणि त्याने षटकार मारला. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारला. त्यामुळे सहाव्या चेंडूवर विजयासाठी फक्त 6 धावांची गरज होती. षटकार मारणार की नाही याची उत्सुकता होती. हा चेंडू टाकला आणि वाइड गेला. त्यामुळे 5 धावा अशी स्थिती आली. गुरबाजने शेवटचा चेंडू मारला पण झेलबाद झाला.