
आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून भारतीय संघ सज्ज झाला आहे 9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला ओमानविरुद्ध आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 काय असेल याची खलबतं आतापासून सुरु आहेत. टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात विकेटकीपर बॅट्समन म्हणून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांचा समावेश केला आहे. संजू सॅमसन मागच्या काही वर्षात टी20 फॉर्मेटमध्ये चांगाली कामगिरी करत आहे. तसेच त्याने विकेटकीपिंगमध्येही चांगली भूमिका बजावली आहे. पण शुबमन गिलचं टी20 संघात पुनरागमन झाल्याने त्याची जागा संकटात आली आहे. कारण यापूर्वी संजू सॅमसन हा ओपनिंग करत होता. मात्र त्या जागी शुबमन गिल फलंदाजी करणार आहे. अशा स्थितीत त्याचं प्लेइंग 11 मधील स्थान डळमळीत झालं आहे. पण असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर संजू सॅमसनच्या पाठीशी उभे राहिले आहेत. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये सहभागी केले पाहीजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
सुनील गावस्कर यांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सांगितलं की, ‘तो मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. संजू सॅमसन पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्याला बाहेर बसवू नये. असं यासाठी की तो विकेटकीपरची भूमिकाही बजावेल. संजू सॅमसन गिफ्टेड खेळाडू आहे. तो परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो. फक्त टॉप ऑर्डरच नाही तर मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. यासाठी आम्हाला चिंता करण्याची जराही गरज नाही.’
आशिया कप स्पर्धेसाठी सुनील गावस्कर यांनी प्लेइंग 11 निवडली आहे. यात ओपनिंगला डावखुरा अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिलला पसंती दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी तिलक वर्मा असेल. चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव उतरेल. तर पाचव्या क्रमांकाची पसंती विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला दिली आहे. सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्या, सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल असेल. तर आठव्या क्रमांकासाठी फिरकीपटू कुलदीप यादवला पसंती दिली आहे. तर वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे उर्वरित खेळाडू असतील.