वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत या तीन युवा खेळाडूंना मिळणार संधी!
भारताने गेल्या काही आयसीसी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं स्वप्न भंगलं. पण त्यानंतर टी20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा मात्र भारताने जिंकली. आतापासून 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत टीमची बांधणी करावी लागणार आहे.

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत जेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत सांघिक कामगिरी दिसून आली. ज्युनियर खेळाडूंनीही सिनियर खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून चमकदार कामगिरी केली. आता भारतीय संघाचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप 2027 वर आहे. दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असून नव्याने टीम बांधावी लागणार आहे. भारतीय संघाची धुरा कोण सांभाळणार? इथपासून तयारी करावी लागणार आहे. असं असताना तीन खेळाडू 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा भाग असू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचा संघात समावेश केला होता. पण शेवटच्या क्षणी त्याचं तिकीट कापलं गेलं. यशस्वी जयस्वालमध्ये चमक आहे आणि त्या जोरावर त्याने आपलं नाव कमावलं आहे. आतापर्यंत 19 कसोटी सामन्यात त्याने 52.88 च्या सरासरीने 1798 धावा केल्या आहेत. एकमेव वनडे खेळला असून 15 धावा, तर 23 टी20 सामन्यात 723 धावा केल्या आहेत.
मयंक यादवने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मागच्या वर्षी टी20 मालिकेतून पदार्पण केलं आहे. 150 च्या स्पीडने चेंडू टाकत असल्याने त्याच्यावर विशेष नजर आहे. जर फिट अँड फाईन राहिला आणि फॉर्मही असेल तर त्याची निवड संघात करावी लागेल. मयंक यादव आपल्या वेगवान गोलंदाजीने आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला साथ देऊ शकतो.
वरुण चक्रवर्तीने टीम इंडियातून ड्रॉप झाल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडलं. वरुण चक्रवर्ती खऱ्या अर्थाने मिस्ट्री गोलंदाज ठरला. भारतासाठी डोकेदुखी ठरलेला ट्रेव्हिस हेडचाही काटा काढला. या स्पर्धेतील 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या. तसेच न्यूझीलंडविरुद्ध साखळी फेरीच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या.
दुसरीकडे, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे दोन वर्षात त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. शुबमन गिल, जसप्रीत बुमराह हे देखील टीमचा भाग असू शकतात. श्रेयस अय्यरही मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आहे.
