
भारतीय वुमन्स क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाने अनेक विक्रम रचले आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरली. तिच्या खेळीमुळे भारताला काही सामन्यात विजय सहज मिळवता आला. विशेष म्हणजे भारताने पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जेतेपदाला गवसणी घातली. असं असताना स्मृती मंधानाच्या वैयक्तिक या आयुष्यातही मागच्या 15 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या. स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं ठरलेलं लग्न मोडलं. त्याची काही कारणं असतील ते काही कळू शकलं नाही. पण या कालावधीत बऱ्याच चर्चा रंगल्या आणि त्या चर्चांमधून वेगवेगळे अर्थ काढले गेले. पण दोघांनी हे लग्न मोडल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं आणि आता हा विषय संपला आहे. असं असताना स्मृती मंधाना आता पुढच्या मार्गाला लागली आहे. स्मृतीने पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दुसरीकडे तिच्या भावाने फोटो पोस्ट करत याला दुजोरा दिला आहे.
स्मृती मंधानाचा भाऊ श्रवणने इंस्टाग्रावर बहिणीचा फोटो शेअर केला आहे. यात स्मृती फलंदाजी करताना दिसत आहे. या फोटोला त्याने तीन लव्ह असलेले इमोजी टाकले आहेत. आता स्मृती पुन्हा एकदा मैदानात परतल्याचं त्याने अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे. जे काही मागे घडलं तो भूतकाळ विसरून आता पुढच्या मार्गावर पाऊल टाकल्याचं त्याच्या पोस्टमधून सिद्ध झालं आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता भावानेच फोटो शेअर केल्याने त्याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय महिला संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी स्मृती मंधानाने सराव सुरु केला आहे. त्यामुळे स्मृती मंधाना 21 डिसेंबरपासून पुन्हा एकदा फलंदाजी करताना दिसणार आहे. तसेच 9 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान, स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तसेच आतापर्यंत पोस्ट केलेले सर्व व्हिडीओ आणि फोटो डिलिट केले आहेत.