
श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या दुखापतीनंतर मैदानापासून दूर आहे. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीतही खेळत नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी किती काळ लागेल असा प्रश्न विचारला जात आहे. कारण न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी अजूनही संघ घोषित केलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर या मालिकेत खेळणार की नाही असा प्रश्न आहे. त्याच्या दुखापतीबाबत एक अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यर बंगळुरुला रवाना झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत आहे. 24 डिसेंबरला मुंबईत फलंदाजी केली आणि त्यानंतर बीसीसीआयच्या सेंट्रल ऑफ एक्सीलेंसमध्ये रवाना झाला आहे. पण मैदानात कधी परतेल हे सांगणं कठीण असल्याचं सांगितलं. पण श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीतून पुनरागमन करण्यास इच्छुक आहे.
25 ऑक्टोबरला सिडनी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर झेल घेताना दुखापतग्रस्त झाला होता. आता त्याला दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या मते, श्रेयस अय्यरला फलंदाजी करताना कोणतीही अडचण जाणवत नाही. त्यामुळे अय्यर बंगळुरुत कोर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चार ते पाच दिवस घालवण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्या मैदानात परतण्याची वेळ निश्चित केली जाईल. श्रेयस अय्यर जिममध्ये नियमित प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. पण पुढच्या चार ते सहा दिवसात त्याच्या फिटनेसबाबत आकलन केलं जाईल. कारण कोणताही खेळाडू फिट जरी असला तरी त्याला लगेच मैदानात उतरण्याची परवानगी दिली जात नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. टी20 संघाची घोषणा आधीच केली आहे. मात्र वनडे संघाची घोषणा केलेली नाही. वनडे मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारीला केली जाण्याची शक्यता आहे. या संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळतं की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कदाचित या मालिकेतून श्रेयस अय्यर मैदानात परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर थेट आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसेल.