W,W,W,W,W, कॅप्टन शार्दुलचा बॉलिंगने कहर, मुंबईचा सलग चौथा विजय, आसामवर 98 धावांनी मात

Shardul Thakur Fifer : कर्णधार शार्दूल ठाकुर याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने आसामवर एकतर्फी विजय मिळवला. शार्दूलने 5 विकेट्स घेतल्या. मात्र शतक करणाऱ्या सर्फराज खान याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

W,W,W,W,W, कॅप्टन शार्दुलचा बॉलिंगने कहर, मुंबईचा सलग चौथा विजय, आसामवर 98 धावांनी मात
Shardul Thakur Fifer Smat
Image Credit source: PTI
Updated on: Dec 02, 2025 | 7:53 PM

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात या स्पर्धेतील सलग आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. मुंबईने आसामवर 98 धावांनी मात करत दणदणीत विजय साकारला. मुंबईने आसामसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर आसामला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. मुंबईने आसामला 19.1 ओव्हरमध्ये 122 रन्सवर गुंडाळलं. मुंबईच्या या विजयात सर्फराज खान आणि शार्दूल ठाकुर या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. शतक करणाऱ्या सर्फराज याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मुंबईसाठी सर्फराज खान याने सर्वाधिक आणि नाबाद 100 धावा केल्या. सर्फराजने 47 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 8 फोरसह शतक केलं. तर अंजिक्य रहाणे याने 42 धावांचं योगदान दिलं. ओपनर आयुष म्हात्रे याने 21 आणि सूर्यकुमार यादवने 20 धावांचं योगदान दिलं. तर साईराज पाटील याने नॉट आऊट 25 रन्स केल्या. तर आसामच्या 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

शार्दूल ठाकुरचा पंजा

कर्णधार शार्दूल ठाकुर याने झटपट झटके देत आसामच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. शार्दूलने पहिल्याच ओव्हरमध्ये आसामच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे मुंबईची अप्रतिम सुरुवात झाली. शार्दूलने आसामला त्यांच्याच डावातील पहिल्या ओव्हरमध्ये डेनिश दास याला आऊट केलं. शार्दूलने तिसऱ्या बॉलवर अब्दुल अजीज कुरेशी याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शार्दूलने पाचव्या बॉलवर रियान पराग याची विकेट घेतली. डेनिश आणि रियान या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.

शार्दूलने त्याच्या कोट्यातली दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. शार्दुलने अशाप्रकारे 7 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या. शार्दुलने तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली. शार्दूलने यासह 5 विकेट्स पूर्ण केल्या. शार्दुलने अशाप्रकारे 23 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आसामची पावर प्लेपर्यंत 6 आऊट 49 अशी वाईट स्थिती झाली.

शार्दुल व्यतिरिक्त मुंबईच्या 3 गोलंदाजांनी 5 विकेट्स घेत आसामचं पॅकअप करण्यात योगदान दिलं. साईराज पाटील आणि अथर्व अंकोलेकर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर शम्स मुलानी याने 1 विकेट मिळवली.

मुंबईचा चौथा सामना केव्हा?

दरम्यान मुंबईचा या स्पर्धेतील चौथा सामना हा गुरुवारी 4 डिसेंबरला होणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात केरळचं आव्हान असणार आहे. मुंबई सलग पाचवा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.