Smriti Mandhana : स्मृती मंधानाचा धमाका, चाबूक खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, माजी कर्णधाराला पछाडलं

Smriti Mandhana World Record : स्मृती मंधानाचं श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20I सामन्यात शतक अवघ्या 20 धावांनी हुकलं. मात्र स्मृतीने या खेळीत 27 धावा करताच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. जाणून घ्या स्मृतीने नक्की काय केलं?

Smriti Mandhana : स्मृती मंधानाचा धमाका, चाबूक खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, माजी कर्णधाराला पछाडलं
Smriti Mandhana Team India
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Dec 28, 2025 | 9:27 PM

टीम इंडियाची उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हीने वैयक्तिक आयुष्यातील वादळानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतून कमबॅक केलं. स्मृतीचं लग्न मोडल्यानंतर ती कशी कामगिरी करते? याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. स्मृतीने वैयक्तिक आयुष्यातील संकटांवर मात करत कमबॅक केलं. मात्र स्मृती पहिल्या 3 सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. स्मृतीला पहिल्या तिन्ही सामन्यात ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र स्मृती त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयशी ठरत होती. मात्र स्मृतीला रविवारी 28 डिसेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात सुर गवसला. स्मृतीने तडाखेदार खेळी करत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातलीय.

दहा हजारी स्मृती

स्मृतीला चौथ्या टी 20i सामन्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 27 धावांची गरज होती. स्मृतीने या सामन्यातील 7 व्या ओव्हरमधील तिसर्‍या बॉलवर 1 धाव घेतली. स्मृती यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारी एकूण चौथी तर दुसरी भारतीय फलंदाज ठरली. स्मृतीने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला.

स्मृतीने शफाली वर्मा हीच्यासह ओपनिंगला येत फटकेबाजी केली. स्मृतीने मैदानात चौफेर फटके मारले आणि अवघ्या 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तसेच शफालीनेही 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या दोघींनी अर्धशतकानंतरही फटकेबाजी सुरु ठेवली. दोघींनाही शतकाची संधी होती. मात्र दोघीही झटपट आऊट झाल्या. शफाली 16 व्या तर स्मृती 17 व्या ओव्हरमध्ये आऊट झाली.

शफाली आऊट होताच 162 धावांची सलामी भागीदारी मोडीत निघाली. या दोघींनी अवघ्या 92 चेंडूत 162 धावांची भागीगदारी केली आणि भारताला वादळी सुरुवात करुन दिली. शफालीने 46 बॉलमध्ये 79 रन्स केल्या. तर स्मृतीने 48 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 11 फोरसह 80 रन्स केल्या.

स्मृतीकडून मिताली राज हीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

स्मृतीआधी एकूण 3 महिला फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा केल्या आहेत. मात्र स्मृती डावांबाबत सर्वात वेगवान 10 हजार धावा करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. स्मृतीने याबाबत माजी कर्णधार मिताली राज हीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

वेगवान 10 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या महिला फलंदाज

स्मृती मंधाना : 281 डाव

मिताली राज : 291 डाव

शार्लोट एडवर्ड्स : 308 डाव

सूझी बेट्स : 314 डाव