
मुंबई: केएल राहुलने (KL Rahul) टीम इंडियात (Team India) पुनरागमन केलय. पण त्याच्या बॅट मधून धावा आटल्या आहेत. राहुल झिम्बाब्वे विरुद्धच्या दोन वनडे (ODI) सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. त्यानंतर सध्या सुरु असलेल्या आशिया कप स्पर्धेतही तो विशेष चमक दाखवू शकलेला नाही. आता केएल राहुल विरोधात माजी क्रिकेटपटूंनी आपली मत मांडण्यास सुरुवात केली आहे. केएल राहुल लवकर फॉर्म मध्ये आला नाही, तर त्याच्या अडचणी वाढतील, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
टी 20 वर्ल्ड कप जवळ आलाय. सिलेक्टर्स फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला जायची संधी देतील. गावस्कर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी केएल राहुलचा पर्यायही सांगितला. “शुभमन गिलने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज मध्ये जो फॉर्म दाखवलाय, निश्चित तो राहुलला पर्याय ठरु शकतो” असं गावस्कर म्हणाले. “जो खेळाडू फॉर्म मध्ये नसेल, त्याला तुम्ही टी 20 वर्ल्ड कपसाठी घेऊन जाणार नाही. टी 20 वर्ल्ड कप मध्ये दोन ते तीन सामने फ्लॉप झाल्यानंतर तो फॉर्म मध्ये येईल अशी अपेक्षा तुम्ही करु शकत नाहीत” असं गावस्कर म्हणाले. “राहुल जवळ काही सामने उरले असून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, तरच निवड समितीने त्याचा विचार करावा” असं गावस्कर यांनी सांगितलं.
आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल शुन्यावर आऊट झाला. नसीन शाहने पहिल्या चेंडूवर राहुलला बोल्ड केलं. त्यानंतर हाँगकाँग विरुद्ध 39 चेंडूत 36 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी होता. मधल्याषटकात तो चौकार खेचू शकला नाही. हाँगकाँगच्या फिरकी गोलंदाजांनी राहुलला अडचणीच आणलं.