पैसा कमवण्याच्या नादात आयसीसीने टीम इंडियाला अडकवलं जाळ्यात! उपांत्य सामना न खेळताच बाहेर जाण्याची भीती
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र टीम इंडिया भलत्याच टेन्शनमध्ये अडकली आहे. कारण आयसीसीमुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे. इतकंच काय तर सामना न खेळताच बाहेर जाण्याची भीती सतावत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानला 47 धावांनी पराभूत केल्याने दोन गुणांसह नेट रनरेट चांगला झाला आहे. आता बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला की उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. पण असं असताना रोहित शर्मासह टीम इंडियाचे अन्य खेळाडू आयसीसीच्या निर्णयाने वैतागले आहेत. टीम इंडियाला रणनितीआधीच समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आयसीसीने पैसे कमवण्याच्या नादात टीम इंडियाला अडचणीत टाकल्याची चर्चा आता क्रीडाप्रेमी करत आहेत. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत आयसीसीच्या निर्णयामुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे. आयसीसीने सुपर 8 फेरीतील टीम इंडियाचे सामने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत. यात प्रत्येक सामन्यात फक्त एका दिवसाचं अंतर आहे. भारताने पहिला सामना बारबाडोसमध्ये खेळला, 22 जूनला बांगलादेशविरुद्ध अँटिग्वामध्ये खेळणार आहे आणि 24 जूनला सेंट लूसियात ऑस्ट्रेलियाशी सामना होईल. यामुळे टीम इंडियाला आराम सोडा सराव करण्यासही संधी मिळत नाही.
आयसीसीने आखलेल्या या वेळापत्रकामागे ब्रॉडकास्टर्स असल्याचा आरोप क्रीडाप्रेमी करत आहेत. पैसे कमवण्यासाठी आणि व्यूअरशिप लक्षात घेत असा निर्णय घेतल्याची चर्चाही रंगली आहे. असं असताना टीम इंडियाने याबाबत अधिकृतपणे कोणतीही तक्रार केलेली नाही. पण वेस्ट इंडिजमध्ये उपस्थित असलेल्या पत्रकारांनी टीम इंडियाच्या वतीने ही बाजू मांडली आहे. आयसीसीच्या आणखी एका निर्णयाचा टीम इंडियाला फटका बसू शकतो. तो म्हणजे सामना न खेळताच स्पर्धेतून बाहेर पडावं लागू शकतं. कारण आयसीसीने उपांत्य फेरीत भारताचं तारीख आणि ठिकाणही निश्चित केलं आहे.
भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला खेळावा लागेल. तसेच 29 जूनला अंतिम फेरीचा सामना आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात फक्त एका दिवसाचं अंतर आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पाऊस पडला तर राखीव दिवस आहे. पण भारतासाठी दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे. कारण या दिवशी पावसाची दाट शक्यता आहे.
पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना झाला नाही तर टीम इंडियाला बाहेर पडावं लागू शकतं. त्यामुळे टीम इंडियावर सुपर 8 फेरीतील तिन्ही सामने जिंकण्याचा दबाव आहे. कारण गुणतालिकेत टॉपला राहिला आणि पावसामुळे सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. पण गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला तर मात्र सामना न खेळताच बाहेर पडावं लागेल. त्यामुळे टीम इंडियाचं जेतेपदाचं स्वप्न आता जर तर वर अवलंबून आहे.
