
टीम इंडिया-पाकिस्तान, 2 कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी. दोन्ही देशातील ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधामुळे उभयसंघ फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने असतात. त्यामुळे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता असते. टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. सामन्याचं तिकीट 20 लाखांच्या घरात आहे. मात्र त्यानंतरही तिकीट उपलब्ध नाहीत. क्रिकेट चाहते अधिकचे पैसे मोजून तिकीट खरेदी करण्यासाठी तयार आहेत, मात्र तिकीट मिळत नाही, ही स्थिती आहे. यावरुन या सामन्याची क्रेझ लक्षात येते.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 9 जून रोजी नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाची धुरा आहे. तर बाबर आझम पाकिस्तानचं नेतृ्त्व करणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघाची एकमेकांसमोर टी 20 फॉर्मेटमध्ये आकडेवारी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात.
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान एकूण 12 सामने झाले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानला 12 पैकी 8 सामन्यात लोळवलं आहे. तर पाकिस्तान फक्त 3 वेळा विजय मिळवता आला आहे. तर दोन्ही संघांमध्ये एक सामना हा बरोबरीत सुटला. टीम इंडियाने तो सामना सुपर ओव्हरमध्ये आपल्या खिशात घातला. टीम इंडियाने अशाप्रकारे पाकिस्तान विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 9 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी एका विजयाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.