T20 World Cup : या एका गोष्टीमुळे भारत फायनलमध्ये पोहोचणार, दिग्गजाचं मोठं भाकीत, दक्षिण आफ्रिकेलाही वाटतीये त्याचीच भीती

भारतानं गुरुवारी झिंबाब्वेचा पराभव केला, या विजयामुळे भारतानं उपात्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत, त्यानंतर आता भारताचा सामना वेस्ट इंडीजसोबत होणार आहे. मात्र त्यापूर्वी क्रिकेट जगतातील दिग्गजानं मोठं वक्तव्य केलं आहे.

T20 World Cup : या एका गोष्टीमुळे भारत फायनलमध्ये पोहोचणार, दिग्गजाचं मोठं भाकीत, दक्षिण आफ्रिकेलाही वाटतीये त्याचीच भीती
Indian team
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 5:01 PM

टी20 वर्ल्ड कप सुरू आहे. टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 फेरीमधले सामने देखील आता जवळपास संपत आले आहेत. सुपर 8 फेरीमधल्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा मोठा धक्का बसला होता. दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केला. या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा खूप खडतर बनला होता. परंतु गुरुवारी भारतीय संघासाठी दोन चांगल्या गोष्टी घडल्या, एक तर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजचा पराभव केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताने सुपर 8 फेरीमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वे संघाला हरवलं, त्यामुळे भारत अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम आहे. मात्र आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर सर्वात मोठा अडथळा असणार आहे, तो म्हणजे वेस्ट इंडीजचा. भारत विरूद्ध वेस्ट इंडीज या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट उपांत्य फेरी गाठणार आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डु प्लेसिस याने मोठं भाकीत वर्तवलं आहे. टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचतील? याबाबत त्याने भाकीत वर्तवलं आहे. टी20 वर्ल्ड कपचा फायनल सामना हा भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होईल असं भाकीत त्याने वर्तवलं आहे. फाफ डु प्लेसिस हा एका कार्यक्रमामध्ये बोलत होता. भारतीय संघ खूप मजबूत आहे. त्यामुळे त्यांना भारतामध्ये हरवणं हे सर्वात कठीण काम आहे. यावेळी सुद्धा फायनलचा सामना हा भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्येच होईल. परंतु यावेळी फायनल आम्ही जिंकू, असं यावेळी फाफ डु प्लेसिस याने म्हटलं आहे.

सर्वात मोठा अडथळा वेस्ट इंडीज

दरम्यान भारतानं सुपर 8 मध्ये एक सामना गमावला आहे, तर एक सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेने आपले दोन्ही सामने जिंकल्यामुळे ते आता जवळपास उपांत्य फेरीमध्ये पोहोचले आहेत. मात्र भारत आणि वेस्ट इंडीजचे प्रत्येकी दोन पॉइंट आहेत. त्यामुळे भारताला जर उपांत्य फेरीचं तिकीट हवं असेल तर त्यासाठी वेस्ट इंडीचा पराभव करावा लागणार आहे. मात्र आतापर्यंत वेस्ट इंडीजच्या संघाने केलेलं प्रदर्शन पहाता हे भारतासमोर मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us