USA vs SA: यूएसएचा लढून पराभव, चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 18 धावांनी विजय
United States vs South Africa Super 8 Match Result: दक्षिण आफ्रिकेने यूनायटेड स्टेट्सवर विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेवर चुरशीच्या झालेल्या सामन्यात 18 धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. यूएसएने या धावांचा शानदार पाठलाग केल्याने सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कमबॅक केलं आणि यूएसएला रोखण्यात यश मिळवलं. यूएसएला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या.
यूएसएने 195 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली होती. स्टीव्हन टेलर आणि अँड्रिज गॉस या दोघांना 33 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर यूएसएने ठराविक अंतराने 5 विकेट्स गमावल्या. स्टीव्हन 24, नितीश कुमार 8, आरोन जोन्स 0, कोरी एंडरसन 12 आणि शायन जहांगीर 3 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे यूएसएचा स्कोअर 5 बाद 76 असा झाला. मात्र त्यानंतर अँड्रिज गॉस आणि हरमीत सिंह या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. या दोघांनीच यूएसएला सामन्यात कायम ठेवलं. मात्र 38 धावांवर हरमीत आऊट झाला आणि इथेच सामना फिरला. कगिसो रबाडा याने अखेरच्या क्षणी चिवट गोलंदाजी करत गेमचेंजरची भूमिका बजावली. रबाडाने 4 ओव्हरमध्ये 18 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तर यूएसएसाठी अँड्रिज गॉसने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
त्याआधी यूएसएने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी बोलावलं. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी ओपनर विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक 74 धावा केल्या. कॅप्टन एडन मारक्रम याने 32 बॉलमध्ये 46 धावा जोडल्या. रिझा हेंड्रिक्सने 11 रन्स केल्या. डेव्हिड मिलर आला तसाच गेला. तर हेन्रिक क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत टीमचा स्कोअर 190 पार पोहचवला. क्लासेनने 22 बॉलमध्ये नॉट आऊट 36 रन्स केल्या. तर स्टब्सने 16 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. यूएसएकूडन सौरभ नेत्रवाळकर आणि हरमीत सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकटेकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शामसी.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग इलेव्हन: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.