T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ दिवशी टीम इंडियाची घोषणा?

Team India Squad For T20I World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्याची 1 मे ही अखेरची तारीख आहे. मात्र निवड समिती त्याआधीच टीम इंडियाची घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी या दिवशी टीम इंडियाची घोषणा?
team india t20 world cup 2022,
Image Credit source: BCCI
| Updated on: Apr 25, 2024 | 7:12 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात दररोज एकसेएक सरस सामने पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठीच्या संघ निवडीकडे लागून राहिलं आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कपला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 मे पर्यंत सहभागी संघांना आपल्या टीमकडून वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. अशात टीम इंडियात कुणाला संधी मिळणार, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 27 एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. आयपीएलच्या 17 व्या मोसमात 27 एप्रिलला मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स असा सामना होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, 27 एप्रिलला दिल्ली विरुद्ध मुंबई सामना आहे. त्यामुळे या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबईचा बॅट्समन रोहित शर्मा हा दिल्लीत असेल. या दिवशी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. आगरकर-रोहित शर्मा यांच्यात 27 एप्रिल रोजी बैठक झाल्यास, 28,29 आणि 30 यापैकी कोणत्याही एका दिवशी भारतीय संघांची घोषणा केली जाऊ शकते.

15 पैकी 10 खेळाडू निश्चित

निवड समितीकडून टी 20 वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश असणार आहे. या 15 पैकी 10 खेळाडूंची नावं निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे 5 जागांसाठी निवड समितीसमोर पेच आहे. तसेच विकेटकीपर म्हणून कुणाला संधी द्यायची, याबाबतही निवड समितीसमोरचा पेच संपल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांची विकेटकीपर म्हणून निवड होऊ शकते. ऋषभ पंतने अपघाताच्या 15 महिन्यांनंतर कमबॅक केलं. त्यामुळे पंत आधीसारखा खेळू शकेल का? अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र पंतने 24 एप्रिलला 43 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 88 धावांची नाबाद खेळी केली. पंतने या दरम्यान अनेक उलटसुलट फटके मारुन आपण फिट असल्याचं दाखवून दिलं.

टी 20 वर्ल्ड कपबाबत थोडक्यात

दरम्यान 1 ते 29 जून दरम्यान टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक टीम साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे.