
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा सामना रविवारी 8 मार्चला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. जगातील सर्वात मोठ्या असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमची आसन क्षमता ही 1 लाखापेक्षा जास्त आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये येण्यासाठी देशातील बहुतांश ठिकाणाहून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांची उपस्थिती असणार आहेत यात अजिबात शंका नाही.
टीम इंडिया यजमान आहे. तसेच घरच्या मैदानात सामना होत असल्याने भारताला चाहत्यांचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाने सलग दुसरा आणि एकूण तिसरा सामना जिंकावा, अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र या महाअंतिम सामन्यातील विजेता कोण ठरणार हे काही अंशी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी ठरणार आहे, असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. असं आम्ही नाही तर या मैदानातील आकडेवारी सांगत आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील हा सातवा सामना असणार आहे. याआधी झालेल्या 6 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत या मैदानात नेदरलँड्सवर 17 धावांनी मात केली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात टॉस फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव याने भारताला कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं आहे. सूर्यकुमार यादव याचा टी 20I कर्णधार म्हणून हा 52 वा टी 20I सामना असणार आहे. सूर्याने त्याआधी टीम इंडियाला 51 पैकी 41 सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. तर भारताला सूर्याच्या नेतृत्वात 8 टी 20I सामने गमवावे लागले आहेत. तर 2 सामन्यांचा निकाला लागला नाही. सूर्याची विजयी टक्केवारी ही 84 इतकी आहे. त्यामुळे आता सूर्या त्याच्या नेतृत्वात भारताला आणखी सामना जिंकून देत पहिल्याच झटक्यात टी 20i वर्ल्ड कप विजेता कर्णधार हा बहुमान मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.