Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा निर्णय;वनडे सीरिजनंतर टी 20 क्रिकेटमध्ये खेळणार! गोलंदाजांना टेन्शन

Rohit Sharma SMAT 2025: टीम इंडियाचा अनुभवी आणि स्फोटक फलंदाज सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रोहित चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा निर्णय;वनडे सीरिजनंतर टी 20 क्रिकेटमध्ये खेळणार! गोलंदाजांना टेन्शन
Rohit Sharma Team India
Image Credit source: PTI
Updated on: Dec 04, 2025 | 3:59 PM

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला बुधवारी 3 डिसेंबरला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं. टीम इंडियाला 358 धावा करुनही विजयी होता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचं आव्हान हे 49.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. बीसीसीआयकडून या सामन्यादरम्यान अनुभवी फलंदाज आणि माजी टी 20I कॅप्टन रोहित शर्मा याच्या हस्ते आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. तसेच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

रोहित शर्मा टी 20 स्पर्धेत खेळणार!

आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर क्रिकेट वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा टी 20 क्रिकेट खेळणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. त्यामुळे गोलंदाजांचे धाबे दणाणले आहेत.

रोहित शर्मा याने टीम इंडियाला 2024 मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर रोहितने टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोहित तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट वगळता आयपीएल स्पर्धेत खेळतोय. मात्र आता रोहितने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील टी 20 स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

टीओआयच्या वृत्तानुसार, रोहितने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) स्पर्धेतील बाद फेरीत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने खेळवण्यात येत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा 6 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर रोहित निवांत असणार आहे.

SMAT स्पर्धेत बाद फेरीतील सामने केव्हा?

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बाद फेरीतील सामने हे 12 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. मुंबईने आतापर्यंत या स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई बाद फेरीत खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे रोहितला या स्पर्धेतील बाद फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते.

रोहित शर्मा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याचा दावा टीओआयने एमसीए सूत्राद्वारे केला आहे. रोहितने या स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केल्याचं एमसीए सूत्राने टीओयआला सांगितलं आहे.