धावा होत नसतील तर आऊट हो…! अभिषेक शर्मामुळे टीम इंडियाचा फायदा, कसा काय ते प्रशिक्षकांनी सांगितलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्माकडून क्रीडाप्रेमींचा विश्वासघात झाला. त्याचं कारण म्हणजे या स्पर्धेत फक्त एक सामना वगळता सर्व सामन्यात फेल गेला. असं असताना माजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्याच्या बाद होण्याबाबत सांगितलं.

धावा होत नसतील तर आऊट हो...! अभिषेक शर्मामुळे टीम इंडियाचा फायदा, कसा काय ते प्रशिक्षकांनी सांगितलं
धावा होत नसतील तर आऊट हो...! अभिषेक शर्मामुळे टीम इंडियाचा फायदा, कसा काय ते प्रशिक्षकांनी सांगितलं
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 02, 2026 | 5:29 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा अभिषेक शर्माच्या कायम स्मरणात राहील. पण चांगल्या नाही तर वाईट कामगिरीसाठी.. कारण या स्पर्धेत अभिषेक शर्माकडून हवी तशी खेळी झालीच नाही. सुरूवातीच्या प्रेशर नसलेल्या सामन्यातही त्याची बॅट चालली नाही. साखळी फेरीत त्याला खातंच खोलता आलं नाही. साखळी फेरीच्या तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खातं खोललं. पण हव्या तशा धावा आल्या नाहीत. झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्ध तशाच कामगिरीची अपेक्षा होती. पण 10 धावा करून तंबूत परतला. इतकंच काय तर गचाळ क्षेत्ररक्षण करून दोन सोपे झेल सोडले. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. असं असताना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी आपलं रोखठोख मत व्यक्त केलं आहे. अभिषेक शर्माने लवकर बाद होत टीम इंडियाचं भलं केलं आहे. असं का ते जाणून घ्या.

माजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी अभिषेक शर्माबाबत मत व्यक्त करताना सांगितलं की, ‘अभिषेकला वेगाने सुरूवात करण्यासाठी ओळखलं जातं. कमी चेंडूत जास्त धावा करतो. पण तसं झालं नाही. अशा स्थितीत सांगितलं जातं की जर तुम्ही धावा करू शकत नाही तर आऊट व्हा. कारण दुसऱ्या फलंदाजांना संधी मिळेल. टी20 क्रिकेट यासाठी वेगळं आहे. शाई होपने पूर्ण पावर प्ले खेळला आणि आऊट झाला.’ त्यामुळे अभिषेक शर्मा लवकर बाद होणं टीम इंडियाच्या हिताचं असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं.

‘जेव्हा अभिषेक शर्मा 9 चेंडूत 9 धावांवर खेळत होता, तेव्हा त्याने बाद होणं ठीक आहे. जर त्याने आणखी फलंदाजी केली असती तर इतर फलंदाजांना जास्त संधी मिळाली नसती. टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक करणं सोपं नाही. अभिषेक शर्माने धावा केल्या नाहीत. पण त्याने टीम इंडियाचा फायदाच केला आहे. त्याने स्ट्राईक रेट आणि रनरेट वर करण्याचा प्रयत्न केला. कारण टीम इंडियाचा विजय सोपा होऊ शकेल. ‘, असंही अभिषेक नायर पुढे म्हणाला. टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपणं आवश्यक आहे. कारण हा सामना हायस्कोअरिंग असेल. मुंबईचं वानखेडे स्टेडियम छोटं असल्याने 200 पार धावा आवश्यक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us