
टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडवर 7 धावांनी मात करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची सलग दुसरी वेळ तर एकूण चौथी वेळ ठरली. इंडिया यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक वेळा पोहचणारी टीम ठरली. टीम इंडियाने यासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच यासह ब्लू आर्मीने ऑस्ट्रेलियाची मक्तेदारीही मोडीत काढली. टीम इंडियाने काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची ही सर्वाधिक चौथी वेळ ठरली आहे. टीम इंडिया 2026 आधी 2024, 2014 आणि 2007 साली फायनमध्ये पोहचली होती. टीम इंडियाने यासह संयुक्तरित्या सर्वाधिक 3 वेळा फायनलमध्ये पोहचण्याबाबत इंग्लंड आणि पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
तसेच इंडिया टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पोहचणारी एकूण आणि तिसरी आशियाई टीम ठरली. याआधी पाकिस्तान आणि श्रीलंकेने अशी कामगिरी करुन दाखवली. पाकिस्तानने 2007 आणि 2009 साली सलग 2 वेळा अंतिम फेरीत धडक दिली होती. तर श्रीलंकेने 2012 आणि 2014 साली फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघ अंतिम फेरीतील पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरले होते. मात्र या दोन्ही संघांनी अंतिम फेरीच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवला आणि वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.
टीम इंडियाची इंग्लंडला पराभूत करुन आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग चौथी तर एकूण आणि सर्वाधिक 15 वी वेळ ठरली. भारताने यासह ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक 14 वेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर केला.
टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करण्याआधी 2023 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20I वर्ल्ड कप तर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं होतं. तर आता टीम इंडियाने 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अशाप्रकारे भारताची आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीची वारी करण्याची ही 15 वी वेळ ठरली.